सामाजिक,धर्मादाय संस्थांच्या धर्तीवर तुळजा भवानी विश्वस्त मंडळाचा निधी उस्मानाबाद जिल्ह्याच्या टंचाई निवारणासाठी द्यावा . मुख्यमंत्र्यांकडे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांची मागणी


मुंबई,  : दुष्काळ निवारणाच्या कामासाठी राज्यातील विविध धर्मादाय व सामाजिक संस्था, संघटना निधी उपलब्ध करून देत आहेत. त्याच धर्तीवर उस्मानाबाद जिल्ह्यातील चारा छावण्या व टंचाई निवारणासाठी तुळजा भवानी विश्वस्त मंडळाकडील निधी उपलब्ध करुन देण्याबाबतची मागणी उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात पालक मंत्री डॉ. सावंत यांनी म्हटले आहे की, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये चारा व पाणी टंचाई आहे. दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनामार्फत मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहे. एकंदर दुष्काळी परिस्थिती पाहता अजून मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असल्याने  उस्मानाबाद जिल्ह्यातील चारा छावण्या व टंचाई निवारणाच्या कामांसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व विश्वस्त मंडळातील सदस्यांनी श्री तुळजा भवानी विश्वस्त मंडळ, तुळजापूर यांच्या कडील निधी उपलब्ध करुन देण्याची विनंती केली आहे.

तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात अतिदक्षता कक्ष सुरू करण्याबाबत या निधीचा वापर केला जावा अशा प्रकारची मागणी यापूर्वीच करण्यात आली आहे. यासंदर्भात विश्वस्त मंडळास सूचना करावी, असे डॉ. सावंत यांनी म्हटले आहे.