राज्यात प्रधानमंत्री आवास योजना प्रभावीपणे राबविणार - मुख्यमंत्री

बातमी
सोलापूर : सर्वसामान्य लोकांचे स्वत:च्या घराचे असलेले स्वप्न साकार करण्यासाठी राज्यात प्रधानमंत्री आवास योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. या योजनेबरोबरच राज्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मधील लोकांना घरे उपलब्ध करुन देण्यासाठी योजना आखण्यात आली असून त्यासाठी तरतूदही उपलब्ध केली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

बार्शी येथील सुखदेवनगर येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गृह प्रकल्पाचे भूमीपूजन मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास पालकमंत्री विजय देशमुख, आमदार सुभाष देशमुख, राजेंद्र मिरगणे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सन 2022 पर्यंत सर्वांना घरे देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालबद्ध कार्यक्रम आखला आहे. राज्यात या योजनेची सुरुवात सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे झाली ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. सामान्य माणसाच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असून सामान्य जनतेचा विकास झाला तरच राज्याचा विकास होतो, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्य दुष्काळाचा सामना करीत असूनही राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात 25 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्यातील शेतकरी सुखी होण्यासाठी त्याला आवश्यक ती मदत करुन त्याच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी शासन प्रयत्न करीत असल्याचेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, राज्यावर सातत्याने येणाऱ्या दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी राज्यात शाश्वत पाणीसाठे निर्माण करण्यास प्राधान्य दिले असून यासाठी जलयुक्त शिवार अभियान हे प्रभावीपणे राबविले जात आहे. गतवर्षी राज्यातील 6 हजार गावांमध्ये या अभियानातून कामे करण्यात आली. या कामांमुळे कमी पाऊस होऊनही राज्यात सुमारे 24 टी.एम.सी. पाणी साठा निर्माण झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्याने सुरु केलेले हे जलयुक्त शिवार अभियान इतर राज्यांना मार्गदर्शक ठरले आहे.

राज्यावरील येणारे दुष्काळाचे सावट कायमस्वरुपी हटविण्यासाठी राज्यात शाश्वत पाणी साठे निर्माण करण्याबरोबरच दुष्काळी भागात पीक पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे. तसेच पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा, असे आवाहनही त्यांनी केले. राज्यात मागेल त्याला शेततळी ही योजना सुरु करण्यात आली असून राज्यभरातून 55 हजार शेतकऱ्यांनी शेततळ्याची मागणी केली आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्याने 6 हजार शेततळ्याची मागणी केली आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेतून बार्शी येथील सुखदेव नगर येथे होत असलेल्या या प्रकल्पातून 3 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्व सामान्यांना घरे उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पातून 860 लोकांना हक्काची घरे उपलब्ध होणार असून ती अद्ययावत अशी असणार आहेत, याचे समाधान मोठे असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

पालकमंत्री विजय देशमुख म्हणाले, दुष्काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. जिल्ह्यात पाणी, चारा याचा प्रश्न भेडसावत असून ज्या भागात गरज आहे अशा ठिकाणी पाण्याचे टँकर व चारा छावण्या देण्यासाठी प्रयत्न केले जातील. आमदार सुभाष देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रारंभ राजेंद्र मिरगणे यांनी स्वागत व प्रस्ताविक केले.