पाण्याचा योग्य व जपून वापर करा - डॉ.प्रशांत नारनवरे


  • उस्मानाबाद : शासनाच्यावतीने यंदा दि. 16 ते 22 मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाची सुरुवात जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते जलपूजनाने करण्यात आली. यावेळी जिल्ह्यात टंचाईची परिस्थिती असल्याने पाण्याचा योग्य व जपून वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच पाण्याचे स्त्रोत बळकटीकरणासाठी प्रयत्न करण्याचे आणि जलसंवर्धन आणि जलपुनर्भरणासाठी शासकीय यंत्रणेबरोबरच प्रत्येक नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन डॉ.नारनवरे यांनी यावेळी केले.

पाण्याचा उपयोग आणि पाण्याची बचत या दृष्टीने जनजागृती करणे हा या सप्ताहाच्या आयोजना मागील मुख्य उद्देश असून गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्यावतीने त्याच्या कार्यक्षेत्रातील दहाही जिल्ह्यात संबंधित जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने आणि विविध स्वयंसेवी संघटनांच्या सहभागाने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्ह्यात या जलजागृतीस प्रारंभ झाला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे, उस्मानाबाद पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता ब.दा. तोंडे यांची यावेळी उपस्थित होते.

डॉ.नारनवरे म्हणाले, जिल्ह्यात गेल्या चार वर्षापासून आपण टंचाईचा सामना करीत आहोत. अशावेळी योग्य पाणीवापर करणे आणि पाण्याचा अपव्यय टाळणे महत्त्वाचे आहे. जास्त पाणी घेणारी पिके टाळून येथील हवामान आणि जमिनीला पूरक पिके घेतली तर पाण्याचा योग्य वापर होऊ शकतो. जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून आपण जलसंवर्धनाच्या दृष्टीने पावले टाकली आहेत. अधिकाधिक लोकसहभागामुळे आपण जलसंवर्धन करुन स्वयंपूर्ण होऊ शकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्हाधिकारी डॉ.नारनवरे आणि मान्यवरांच्या हस्ते यावेळी दीपप्रज्वलन आणि जलपूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी पाण्याचा वापर गरजेपुरता आणि काटकसरीने करण्याबाबत आणि नैसर्गिक प्रवाह, जलाशय, कालवे आणि पाणीपुरवठ्याच्या पायाभूत सुविधांचे रक्षण करण्याबाबत प्रतिज्ञा घेतली.

या जलजागृती सप्ताहात जलदौड (वॉटर रन) आयोजित करणे, पाण्याच्या बचतीचे माहिती फलक लावणे आणि कमी पाण्यात यशस्वी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करणे या बाबींचा प्रामुख्याने समावेश आहे.

या सप्ताहातील विविध उपक्रमात जलसंपदा विभाग, कृषि, पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसाय विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, पर्यावरण व उद्योग विभाग तसेच ग्रामविकास व जलसंधारण विभाग सहभागी होणार आहेत.