रब्बी हंगामात 50 पैशांपेक्षा कमी पैसेवारी आलेल्या गावातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ
मुंबई : महसूल व वन विभागाने राज्यातील 2015-16 च्या रब्बी हंगामात जिल्हाधिकारी यांनी 50 पैशांपेक्षा कमी पैसेवारी घोषित केलेल्या 1053 गावामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे. दुष्काळसदृश परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमध्ये शालेय/ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचे जाहीर केले आहे.

या 1,053 गावांमधील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात येत आहे. राज्यातील ज्या गावांची खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांची अंतिम पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आहे अशा टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफीची योजना लागू केली आहे. या योजनेत अकृषी विद्यापीठांकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांचाही समावेश आहे. हा शासन निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत नुकताच निर्गमित करण्यात आला आहे. सदर निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.