राज्यातील 43 हजार गावात एलईडी पथदिवे

गावागावांत ऊर्जा कार्यक्षम पथ दिव्यांची योजना राबविण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे 43 हजार 665 गावांत ही योजना राबविता येणार आहे. यातून विजेची व खर्चाची बचत होणार आहे. भविष्यातील ऊर्जेची वाढती मागणी तसेच यावर होणाऱ्या खर्चाला नियंत्रित ठेवण्याचा भाग म्हणून ही योजना राबविण्यात येणार असल्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईत सांगितले. 

राज्यातील प्रत्येक गावात कमीत कमी 60 पथदिवे आहेत. तेथे विजेचा जादा वापर होतो. अशा स्थितीत विजेचा कमी वापर होऊन जास्त प्रकाश देण्यास पूरक ठरणारे एलईडीचे दिवे पथ दिवे म्हणून वापरल्यास सध्याच्या वीज वापराच्या तुलनेत 50 ते 60 टक्के विजेची बचत होईल, असा दावा ऊर्जामंत्र्यांनी केला आहे. 

या शिवाय एलईडी दिव्यांचे आयुष्यमान 50 हजार ते एक लाख तास आहे. त्यामुळे हा दिवा दुरुस्त करण्याची गरज लागणार नाही. या योजनेसाठी 10 टक्के खर्च ग्रामपंचायतीनी करायचा आहे. उर्वरित 90 टक्के अनुदान मिळणार आहे. 

ग्राम स्वच्छता अभियानसारख्या शासनाच्या अन्य योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत; तसेच ज्या गावांची लोकसंख्या 5 हजारावर आहे, अशा गावांना हा लाभ प्राधान्याने देण्यात येणार आहे.