टीईटी परीक्षेचा 'तो' पेपर रद्द ! पेपरफुटी : एप्रिलमध्ये पुन्हा परीक्षा


उस्मानाबाद : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) १६ जानेवारी रोजी झाली होती. परंतु, पेपरफुटीच्या पार्श्‍वभूमीवर सदरील परीक्षेतील पेपर क्र. १ अखेर रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात ही परीक्षा नव्याने घेतली जाणार आहे.
राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 'महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-२0१५ १६ जानेवारी रोजी घेण्यात आली होती. परीक्षेदरम्यान पेपर क्र. १ फुटल्याचा प्रकार उजेडात आला होता. दरम्यान, सदरील प्रकारामुळे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना फटका बसण्याची दाट शक्यता असते. ही बाब लक्षात घेवून शासनाने उपरोक्त पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. हा आदेश शिक्षण विभागाला ९ फेब्रुवारी रोजी प्राप्त झाला असून एप्रिल २0१६ मध्ये शासनाच्या मान्यतनेने सदरील पेपरची नव्याने परीक्षा घेतली जाणार आहे.