ग्रामीण भागातील रुग्णांनी राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ घ्यावा - विधानसभा अध्यक्ष बागडे


 
 
.
उस्मानाबाद : ढोकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र 1 कोटी 29 लाख रुपये खर्चून बांधण्यात आले आहे. या केंद्रामार्फत विविध योजनेतून ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य विषयक समस्या सोडविणे हा मुख्य उद्देश आहे. या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून या भागातील गरीब रुग्णांनी राजीव गांधी जीवनदायी योजनेत विविध रोगांवर उपचार करण्यात येतील. या आरोग्य योजनेची माहिती रुग्णांनी करुन घ्यावी. या शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ ग्रामीण भागातील शेतकरी व गरजूंनी घ्यावा, असे प्रतिपादन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले.

ढोकी येथे आयोजित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नुतन इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी श्री.बागडे बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी आमदार बसवराज पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ॲड.कुलदीप पाटील, उपाध्यक्ष सुधाकर गुंड, सभापती दत्ता मोहिते, हरिष डावरे, दगडू धावारे, दत्ता कुलकर्णी, संजय पाटील दुधगावकर, मिलींद पाटील, नितीन काळे, सरपंच श्रीमती सुनंदा आवटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, सचिव बारवकर, तहसीलदार सुभाष काकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी. पवार, वैद्यकीय अधिकारी श्रीमती डॉ.ए.एल.उदगीरकर, श्रीमती डॉ.के.के.गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य, ग्राम पंचायत समिती सदस्य यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

श्री.बागडे म्हणाले, या आरोग्य केंद्रात रिक्तपदे भरण्याबाबत पाठपुरवा केला जाईल. या भागातील दुर्जर आजाराच्या रुग्णांवर योग्य ते उपचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मुलगा किंवा मुलगी असा भेद न ठेवता स्त्री-पुरुष समानता ठेवावी, असे सांगून ते म्हणाले, शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नये. त्यासाठी सर्वांनी त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या तात्काळ सोडवाव्यात व त्यांना आत्महत्यापासून रोखण्यासाठी धीर द्यावा. यावर्षी पाऊस न पडल्याने या भागात पाण्याची कमतरता जाणवत आहे. अशावेळी जलयुक्त शिवारांची कामे सुरु करुन सर्वांनी पडणाऱ्या पावसाचे पाणी साठवून ठेवावे. त्याचा वापर जपून करावा म्हणजे भविष्यात अडचणी वेळी कामी येईल. प्रत्येक गावात मनरेगाची कामे सुरु करुन नागरिकांच्या हाताला काम देण्यासाठी सरपंच व ग्रामसेवकांनी पुढाकार घ्यावा. चारा छावण्या, सावकारांकडील व इतर कर्जाबाबत शेतकऱ्यांना एकत्र घेऊन सामोपचाराने मार्ग काढावा. या जिल्ह्यासाठी शासनमार्फत योग्य ती मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करु, असे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार बसवराज पाटील, आमदार राणा जगजितसिंह पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ॲड.कुलदीप पाटील, संजय पाटील दुधगावकर, ॲड.मिलींद पाटील यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.

यावेळी उस्मानाबाद जिल्हा आरोग्य विभागाने महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर केलेल्या कौतुकास्पद कामगिरीबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी. पवार यांचा त्यांच्या व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी चार उपकेंद्रांसाठी जमीन दान दिलेल्या श्री.देशमुख काका, नारायण गाडेकर, भारत पडवळ आणि श्री.वडगणे शेतकऱ्यांचाही सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पाटील दुधगावकर यांनी केले. सूत्रसंचालन पांडूरंग वाकूरे यांनी केले.