वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेच्या आराखड्यास सामाजिक न्याय मंत्र्यांची मंजुरी

मुंबई : विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या सर्व जाती जमातींकरिता असलेल्या ‘वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजने’च्या बृहत आराखड्यास 28 फेब्रुवारी 2014 च्या शासन निर्णयाच्या अधिन राहून सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी मंजुरी दिली.

मंत्रालय येथील दालनात तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत बृहत आराखड्याबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव जा. मा. गोसावी, सहाय्यक संचालक (व्हीजेएनटी) शोभा कुलकर्णी आदी उपस्थित होते.

श्री. बडोले म्हणाले की, विमुक्त जाती, भटक्या वस्त्यांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात आवश्यक नागरी सुविधा पोहचणे गरजेचे आहे. परंतु काही जिल्ह्यातील लोकसंख्येचा बृहत आराखडा प्राप्त नसल्याने निधी मंजूर होऊ शकत नव्हते. हा आराखडा मंजूर झाल्याने या पात्र भटक्या वस्त्यांना निधी व आवश्यक त्या सुविधा पुरविणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर 28 जिल्ह्यांतील बृहत आराखडा प्राप्त झाले असून उर्वरित 6 जिल्ह्यांचे बृहत आराखडे तातडीने मिळविण्याचे निर्देशही श्री. बडोले यांनी यावेळी संबंधितांना दिले.