बेंबळी येथे जलयुक्त शिवाराची कामे होण्याबाबत गावकर्‍यांची मागणीबेंबळी येथे जलयुक्त शिवाराची कामे होण्याबाबत गावकर्‍यांची मागणी
.उस्मानाबाद      १५ हजार लोकवस्तीचे गाव असून तेथे सध्या सहा टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. गावाच्या जवळपास ८ कि.मी.मध्ये कसलेही जलस्त्रोत उपलब्ध नाही. अनेक बोअर व विहीरी असून त्या पूर्णपणे आटलेल्या आहेत. या शिवाय गावाची भौगोलिक रचना २५ ते ३० फुट काळी माती व त्याखाली काळा पाषाण अशी आहे. त्यामुळे कसलेही जलस्त्रोत उपलब्ध होणे कठीण जाते. गावाच्या दक्षिणेकडून सावळा नदी वाहत असून या नदीवर रुईभर येथे मध्यम प्रकल्प बांधला आहे व मध्यम प्रकल्पाचे पाणी उस्मानाबादला पिण्यासाठी दिल्यामुळे बेंबळीला कॅनॉलची कामे होऊनही एक थेंबही पाणी शेतीसाठी मिळालेले नाही. व नदी पात्र मात्र पूर्ण कोरडी झालेले असून गाळाने भरून गेलेले आहे. रुईभर धरण ते गौडगाव ता.उस्मानाबाद येथे जलयुक्त शिवाराचे काम पूर्ण झालेले आहे. तर गावाच्या पुर्वेस माजी आ.पाशा पटेल यांच्या प्रेरणेतून उजनी ता.औसा व तेरणा नदीचे पात्र जलयुक्त शिवाराचे योजनेखाली आणले आहे. मधला सहा कि.मी.चा पट्टा या योजनेपासून मात्र वंचित राहिलेला आहे. जर जलयुक्त शिवाराची कामे हाती घेतली तर बेंबळी गावाचा पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न पूर्णपणे सुटेल व मुक्या जनावरांसाठी पाणीउपलब्ध होईल. वास्तविक पाहता बेंबळी हे गाव प्रशासकीय कामासाठी उस्मानाबाद तालुक्यात असले तरी मतदारसंघ मात्र तुळजापूर दिला आहे. साहजिकच लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांचा समन्वय होताना दिसून येत नाही. त्यामुळे या भागातील जनतेची पूर्ण विकासकामे व प्रशासकीय सहाय्य योजना अडचणीत आलेली आहे. व सध्यातरी कुठल्याच राजकीय पक्षाची मंडळी फिरकतानाही दिसत नाहीत. याकरीता या भागातील जनतेची जलयुक्त शिवाराची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी येथील नागरीकांतून होत आहे. त्याचबरोबर सावळा नदीस मिळणारे नदीनाले व ओढे याचे रुंदीकरण व खोलीकरण करण्यात यावे अशीही मागणी होत आहे.

--