पालक सचिवांनी घेतला जिल्ह्यातील टंचाईबाबत आढावा

उस्मानाबाद : शासनामार्फत जनकल्याणासाठी जिल्ह्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत. शेतीवर आधारित प्रक्रिया करणारे नव-नवीन उद्योग निर्मितीसाठी प्रयत्न करावेत. शासकीय योजनांची माहिती ग्रामपातळीपर्यंत प्रशासनामार्फत पोहचावावी. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कलापथक, विविध मंडळे व संस्थाचालकांच्या माध्यमातून जनजागृती करावी. जिल्ह्यातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी सर्वातोपरी प्राधान्य देण्यात येईल, असे प्रतिपादन पालक सचिव महेश पाठक यांनी केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे, प्रभोदय मुळे, उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, पशुसंवर्धन अधिकारी डॉ.शीतलकुमार मुकणे, पशु संवर्धन आयुक्त श्री.भोसले, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.

जिल्ह्यातील महत्त्वाचा प्रश्न जनावरांना चारा व छावणी, पिण्याचे पाणी, मजूरांना रोजगार, शेततळे, अपूर्ण जलसंधारणाची कामे पूर्ण करण्याबाबत माहिती घेऊन श्री.पाठक यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यांचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

डॉ.नारनवरे यांनी बैठकीत जिल्ह्यात रब्बी व खरीप पेरणी व उत्पादन, चारा उपलब्धतेसाठीचे उपाय, चारा बंदी, चारा छावण्या, पिण्याच्या पाण्याची स्थिती, रोजगार हमी योजनेतील कामे, पाणी पातळी, सिंचन विहिरींची प्रगती, आधार नोंदणी, मग्रारोहयोतर्गत विहिर पुनर्भरण, मागेल त्याला शेततळे, मनुष्य दिन निर्मिती आदी बाबत सविस्तर माहिती यावेळी दिली.
यावेळी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन ‍विभागामार्फत कामधेनू दत्तक ग्राम योजना सन 2014-15 चा फलश्रुती अहवाल या पुस्तिकेचे पालक सचिव श्री.पाठक, जिल्हाधिकारी डॉ.नारनवरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
टंचाई भागाची पाहणी, चारा छावणी व रोप वाटीकेस भेटी
उस्मानाबाद तालुक्यातील वाणेवाडी येथील राष्ट्रसंत भगवानबाबा बहुउद्देशीय ग्रामीण विकास यंत्रणा आनंदवाडी संचलित चारा छावणीस श्री.पाठक यांनी भेट देऊन तेथील चारा छावणी संदर्भातील चारा कार्ड, भेट पंजिका, पशुखाद्य वितरण याबाबत माहिती घेतली. तसेच त्यांनी जनावरांसाठी उत्पादित करण्यात येत असलेल्या हायड्रोफोनीक आणि अजोला चारा प्रकल्पाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पळसप येथील पिण्याच्या पाण्याची विहिर, टँकरद्वारे करण्यात येत असलेल्या पाण्याची तपासणी व जलयुक्त शिवार योजनेतील कामांची पाहणी केली. पळसप येथील नरवडे ॲग्रो पार्कला भेट देऊन तेथील पालेभाजी रोपवाटिकाची पाहणी केली.