गुन्ह्यांच्या शिक्षेबाबत राज्य देशात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्नशील- मीरा बोरवणकर

प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे उद्घाटन

नांदेड :
गुन्ह्यांसाठीच्या शिक्षेच्या प्रमाणात वाढ होण्यात राज्य देशात अग्रेसर राहील, यासाठी प्रयत्नशील असल्याचे राज्याच्या न्यायिक व तांत्रिक विभागाच्या महासंचालक मीरा बोरवणकर यांनी सांगितले.

डॅा. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जुन्या इमारतीतील प्रादेशिक न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या उद्घाटनप्रसंगी श्रीमती बोरवणकर बोलत होत्या. यावेळी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, पोलीस अधीक्षक परमजितसिंह दहिया, डॅा. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप म्हैसेकर, न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाचे राज्याचे प्रभारी संचालक बा. ब. दौंडकर, नांदेडच्या प्रयोगशाळेच्या उपसंचालक डॉ. हे. अ. देशपांडे आदी उपस्थित होते.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या जुन्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर प्रयोगशाळा कार्यान्वित राहणार आहे. याठिकाणी नांदेडसह हिंगोली, परभणी आणि लातूर या जिल्ह्यातील प्रकरणात न्याय सहायक वैज्ञानिक तपासणी केली जाणार आहे. याठिकाणी विषशास्त्र, सामान्य विश्लेषण व उपकरणीय, जीवशास्त्र, दारूबंदी व उत्पादन शुल्क असे विभाग कार्यान्वित करण्यात येत आहेत.

श्रीमती बोरवणकर म्हणाल्या, गुन्ह्यांमध्ये शिक्षेचे प्रमाण वाढावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. ही एक सांघिक कामगिरी आहे. त्यामध्ये पोलीस, वैद्यकीय अधिकारी, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा पुढे विधीज्ज्ञ आणि न्यायपालिका यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. त्यामुळे गुन्ह्यांमध्ये दोषारोप सिद्ध होऊन शिक्षा होण्यासाठीच्या या प्रक्रियेची नागरिकांनीही आणि विविध घटकांनीही माहिती घेणे आवश्यक आहे. न्यायसहायक प्रयोगशाळांच्या कामकाजाबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी यासाठी जनजागरण सप्ताहही साजरा केला जात आहे. राज्यात सहा प्रयोगशाळा कार्यरत आहेत. सातवी प्रादेशिक प्रयोगशाळा नांदेड येथे कार्यान्वित होत आहे तर आठवी प्रयोगशाळा कोल्हापूरमध्ये होणार आहे. राज्यातील न्यायसहाक वैज्ञानिक प्रयोगशाळांकडे आंतरराष्ट्रीयस्तरावर नावाजलेले आणि सक्षम असे तज्ज्ञ आहेत.

विभागाला अद्ययावत उपकरणे, तंत्रज्ञानाने सज्ज ठेवण्याचा प्रयत्न असतो. त्यासाठी या प्रयोगशाळांना आयएसओ मानांकने मिळवण्यासाठीही प्रयत्न आहे. विभागाचे अद्ययावत असे संकेतस्थळही येत्या काळात सुरु केले जाणार आहे. याशिवाय विभागांतर्गत संवादासाठी गृहपत्रिकाही सुरु केली जाणार आहे. या सर्वातून नागरिकांशी, विभागांतर्गत आणि विविधस्तरावरून संवाद वाढावा अशीच अपेक्षा आहे. जेणेकरून राज्यात घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये शिक्षेचे प्रमाण वाढावे, ते देशात प्रथम क्रमांकाचे राहील, असे प्रयत्न असल्याचेही श्रीमती बोरवणकर म्हणाल्या.

श्री. दौंडकर म्हणाले, या प्रयोगशाळेत डीएनए, सायबर गुन्हे, ध्वनी आणि ध्वनीफित तपासणी अशी अद्ययावत यंत्रणा कार्यान्वित केली जाईल. तसेच प्रयोगशाळेसाठी विष्णुपूरी येथील डॅा. शंकरराव चव्हाण आरोग्य संकुल परिसरातही सव्वा तीन एकर जागा मिळाल्यानेही ही प्रयोगशाळा पूर्ण क्षमतेने चार जिल्ह्यांसाठी कार्यान्वित करता येणार आहे.

यावेळी श्री. दहिया यांचेही भाषण झाले. समारंभात अधिष्ठाता डॉ. म्हैसेकर, डॅा. दी. बा. जोशी, डॅा. हेमंत गोडबोले, बी. आर. चांदेगावकर, बालाजी डोळे, श्री. राठोड यांचा तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॅा. विजय कंदेवाड, कार्यकारी अभियंता गजेंद्र राजपूत यांचा सत्कार करण्यात आला. उपसंचालक डॅा. हे. अ. देशमुख यांनी आभार मानले.

तत्पूर्वी श्रीमती बोरवणकर व मान्यवरांच्या हस्ते प्रयोगशाळेच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले तसेच प्रयोगशाळेतील विभागांचे फित कापून उद्घाटन करण्यात आले.