आरोग्यकेंद्राच्या उद्घाटनामध्ये आरोग्यमंत्र्यांना डावलल्यामुळे शिवसैनिकांत नाराजी,


जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांच्याकडून भाजपसह जिल्हा परिषदेचा निषेध
धाराशिव- ढोकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उद्घाटनावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत  यांना डावलण्यात आल्यामुळे शिवसैनिकांतून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच कार्यक्रमावर शिवसेनेने बहिष्कार टाकला होता. मित्र पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीने आणि जिल्हा परिषदेने आरोग्य विभागाशी संबंधित असलेल्या मंत्र्यांना आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना वास्तूच्या उद्घाटनापासून वंचित ठेवणे, हे गंभीर असून, या प्रकाराचा निषेध करतो, असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांनी म्हटले आहे.
.पाटील यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ढोकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी आम्ही शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अॅड.धीरज पाटील यांना भेटलो होतो. आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत हे जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने त्यंाच्या हस्ते वास्तूचे उद्घाटन करू, अशी आम्ही त्यांच्याकडे विनंती केली होती. मात्र, अॅड.धीरज पाटील यांनी आम्हाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या इमारतीच्या उदघाटनासाठी येणार आहेत, त्यांच्या हस्ते आणि आरोग्यमंत्री डॉ.सावंत यांच्या उपस्थितीत उद्घाटन करू, असे सांगितले होते.त्यामुळे आम्हीही त्यासाठी तयार होतो. यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केल्याचे सांगितले होते. असे असताना शनिवार, दिनांक ६ फेब्रुवारी २०१६ रोजी अचानकपणे विधानसभेचे अध्यक्ष श्री.हरिभाऊ बागडे यंाच्या हस्ते ढोकी आरोग्य केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन उरकण्यात आले. वस्तुत:राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.सावंत यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नव्हते.त्यांना डावलून इमारतीचे उद्घाटन केल्यामुळे शिवसेनेत प्रचंड नाराजी पसरली असून, भाजपने तसेच जिल्हा परिषदेने मंत्रीपदाचा विचार करण्याची गरज होती. या इमारतीच्या निधीसाठी पालकमंत्री डॉ.सावंत यांनी प्रयत्न केले होते, असे असताना त्यांना डावलण्याचे कारण काय होते, हे जिल्हा परिषदेने आणि भाजपने स्पष्ट करावे.अन्यथा जिल्हा परिषदेत असलेली काँग्रेससोबतची युती ठेवायची की नाही,याबाबत गांभीर्याने विचार केला जाईल.आसे दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.