देऊळगावराजा येथे देशातील सर्वात मोठे सीड हब - मुख्यमंत्री

बातमी
  • महाराष्ट्रात फळ प्रक्रियेसाठी पेप्सिको इंडियासोबत सामंजस्य करार
  • अमेरिकन उद्योजकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
  • ‘मेक इन इंडिया सप्ताह’

मुंबई :
महाराष्ट्रातील फलोत्पादनाला चालना देण्यासाठी आणि फळांवर प्रक्रिया करणारा प्रकल्प सुरु करण्याबाबत राज्याचा कृषी विभाग आणि पेप्सिको कंपनी यांच्यात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. मोन्सेन्टो कंपनीतर्फे बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा येथे देशातील सर्वात मोठे सीड हब उभारण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.

उद्योग मंत्री सुभाष देसाई व अमेरिकेचे भारतातील कौन्सुलेट जनरल टॉम वायडा यावेळी उपस्थित होते. मेक इन इंडिया सप्ताहाच्या चौथ्या दिवशी अमेरिकेतील 30 नामवंत कंपन्यांच्या प्रतिनिधी शिष्टमंडळाने मेक इन इंडिया सेंटरमध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. सुमारे तासभर झालेल्या चर्चेत अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली.

अमेरिकेचे कौन्सुलेट जनरल टॉम वायडा यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेच्या उद्योजकांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. यावेळी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव डी. के. जैन व पेप्सिको इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. शिवकुमार यांनी महाराष्ट्रात फळप्रक्रिया उद्योग सुरु करण्यासंदर्भात सामंजस्य करार केला. या करारानुसार महाराष्ट्रातील संत्रा, मोसंबी फळांवर प्रक्रिया करुन त्याचा रस बनविण्याचा प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे राज्यातील विदर्भ व मराठवाड्यातील संत्रा आणि मोसंबी फळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. महाराष्ट्र हे जागतिक दर्जाचे फ्रुट हब होण्यासाठी पेप्सिको इंडिया सहाय्य करील. या प्रकल्पामुळे राज्यातील सुमारे दोन लाख हेक्टर क्षेत्रावरील संत्रा व मोसंबी फळपिकावर प्रक्रिया केली जाणार आहे. यासोबतच पेप्सिको आंबा, डाळिंब या फळांपासून रस बनवित असल्याने राज्यातील या फळ उत्पादक शेतकऱ्यांनाही फायदा होणार आहे.

अमेरिकेतील मोन्सेटो कंपनीतर्फे बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे देशातील सर्वात मोठे सीड हब करण्याचा प्रकल्प सुरु करण्यात येणार असल्याची माहिती या कंपनीच्या प्रतिनिधींनी दिल्यावर मुख्यमंत्र्यांनी त्याचे स्वागत केले आणि लवकरात लवकर प्रकल्प सुरु करावा राज्य शासनाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

अमेरिकेतील उद्योजकांच्या शिष्टमंडळासोबत यावेळी स्मार्ट सिटी, इलेक्ट्रानिक पॉलिसी, औद्योगिक धोरण, मेक इन महाराष्ट्र आदी विविध क्षेत्रांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रात उद्योग स्थापन केलेल्या आणि नव्याने उद्योग सुरु करु इच्छित असलेल्या अमेरिकन कंपन्याच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांकडे महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली. महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी सकारात्मक वातावरण असून संपूर्ण जगाचे लक्ष महाराष्ट्रावर केंद्रीत झाले आहे. या यशाचे रहस्य काय? असा प्रश्न शिष्टमंडळातील प्रतिनिधीने विचारल्यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सकारात्मक वातावरण आणि स्वत:हून पुढाकार घेऊन काम करण्याची वृत्ती आणि उत्तम प्रशासन त्याच बरोबर उद्योग वाढीसाठी घेतलेले निर्णय यामुळे महाराष्ट्रात गुंतवणूकीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. मेक इन इंडिया सप्ताहामुळे जगाचा महाराष्ट्राविषयी असलेला सकारात्मक दृष्टीकोनही पाहायला मिळाला, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्रात दहा स्मार्ट सिटी करण्याचे नियोजन केले आहे. त्यामध्ये काही अमेरिकन कंपन्यांनी सहभाग नोंदविण्याची इच्छा व्यक्त केली. त्याचे स्वागत करुन मुख्यमंत्री म्हणाले की, शंभर टक्के घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, सांडपाणी प्रक्रिया याशिवाय कुठलेही शहर स्मार्ट होणार नाही यावर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. महाराष्ट्रात गुंतवणूकीच्या अनेक संधी आहे. कृषी क्षेत्रात गुंतवणूकीसाठी मोठा वाव असून कृषी क्षेत्र हे सेवा क्षेत्राशी आणि उद्योग क्षेत्र हे नवनवीन तंत्रज्ञान व संकल्पनाशी जोडले गेले तर महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळणार आहे आणि हाच अजेंडा घेऊन वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील उद्योगाच्या संधीबाबत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई सारखे जागतिक दर्जाचे शहर शक्तीकेंद्र असून या शहराबरोबरच मुंबई महानगर परिसराचा विकास करण्यासाठी पायाभूत प्रकल्पांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. मुंबई व महानगर परिसरात राहणाऱ्या सर्वसामान्यांचा दैनंदिन प्रवास सुखकर आणि कमी कालावधीचा व्हावा यासाठी सर्वसमावेशक दळणवळण आराखडा तयार करण्यात येत आहे. यासाठी अमेरिकेतील नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करुन दिल्यास हे क्षेत्र गुंतवणूकीसाठी उपलब्ध होणार आहे.

यावेळी अमेरिकेच्या उद्योजकांनी महाराष्ट्रात उद्योग सुरु करणे सहज आणि सुलभ झाल्याची भावना व्यक्त केली. यावेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांनी सिडकोतर्फे नवी मुंबईत करण्यात येत असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाबाबत माहिती दिली. नगरविकास विभागाच्या सचिव मनिषा म्हैसकर यांनी राज्यातील दहा शहरांचा स्मार्ट सिटीत समावेश झाल्याचे सांगून या शहरांच्या विकासासाठी करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांबाबत शिष्टमंडळाला माहिती दिली.

यावेळी अमेरिका आणि महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून न्यूयार्क येथे महाराष्ट्र विकास परिषद स्थापन करण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला. महाराष्ट्रातील सामाजिक आर्थिक विकासासाठी अमेरिकेतील महाराष्ट्र मित्रमंडळाचे सहकार्य या माध्यमातून लाभणार आहे. यासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री रणजित पाटील, न्यूयॉर्कमधील भारताचे कौन्सिल जनरल ज्ञानेश्वर मुळे आदी उपस्थित होते.

अमेरिकेच्या शिष्टमंडळात युनाटेड स्टेटस् इंडिया बिझनेस कौन्सिलचे ब्रॅण्डन बॅनर, अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सचे सुरभी वहाल, ॲपको वर्ल्ड वाईडचे सुकांती घोष यांच्यासह विविध नामवंत कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविण परदेशी, सचिव मिलिंद म्हैसकर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, राज्यशिष्टाचार विभागाचे अपर मुख्य सचिव सुमीत मल्लिक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुषण गगराणी आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.