वृत्त संस्था - सियाचिन भागात हिमपात होऊन बेपत्ता झालेल्या जवानांपैकी
लान्सनायक हनुमंतप्पा कोप्पड हा जवान
आश्चर्यकारकरीत्या बचावला असून,
त्याला एअर ऍम्ब्युलन्समधून नवी दिल्ली येथील रुग्णालयात हलविण्यात आले
आहे. तो सध्या कोमात असून, त्याची प्रकृती गंभीर असली, तरी स्थिर असल्याचे
डॉक्टरांनी सांगितले.
गेल्या आठवड्यात झालेल्या
हिमपातामध्ये दहा जवान बेपत्ता झाले होते. पाकिस्तानला लागून असलेल्या
प्रत्यक्ष ताबारेषेजवळ २०,५०० फूट उंचीवरील लष्करी ठाण्यावर हिमपात झाला
होता. ते सर्व मृत्युमुखी पडल्याचे लष्कराच्या उत्तर विभागाचे प्रमुख
लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा यांनी जाहीर केले होते. नऊ जवानांचे मृतदेह
मिळाले आहेत. शोधमोहीम सुरू असताना तीस फूट खोल बर्फाखाली गंभीर अवस्थेत
असलेला हनुमंतप्पा पथकाला आढळून आला. तो उणे ४५ अंश सेल्सिअस तापमानात
तब्बल सहा दिवस येथे अशा अवस्थेत जिवंत राहिल्याने पथकाला आश्चर्याचा सुखद
धक्का बसला. त्याला तातडीने दिल्ली येथे विमानातून हलविण्यात आले.
सियाचिनसारख्या
जगातील सर्वोच्च उंचीवरील युद्धभूमीवर मानवी शत्रूपेक्षा निसर्गाशीच लढाई
करणारा लान्सनायक हनुमंतप्पा कोप्पड हा सध्या जगण्याची लढाई लढतो आहे.
लष्कराच्या रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तब्बल
१५० जवान आणि दोन श्वानांच्या पथकाने त्याचा शोध घेतला. या शोधकार्यात या
दोन्ही श्वानांची कामगिरी मोलाची ठरली. सुरवातीला मृत म्हणून घोषित
केल्यानंतर काल तो सापडल्यानंतर सर्वांना सुखद धक्का बसला. त्याला भारतीय
हवाई दलाच्या विमानातून तातडीने नवी दिल्लीला हलविण्यात आले. विमानात
त्याच्या प्रकृतीवर देखरेख ठेवण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते.
त्याची प्राथमिक तपासणी केली असता, साधारणपणे अशा घटनांमध्ये फ्रोस्ट बाइट
अथवा हाडांना दुखापत होते. हनुमंतप्पाला मात्र असे काहीही झाले नाही.
मात्र, तो सध्या कोमात असल्याने आणि बर्फामुळे आतील अवयव काही प्रमाणात
गोठल्याने त्याला सध्या व्हेंटिलेटरवर ठेवून श्वसनमार्ग आणि फुफ्फुसे
वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. अतिथंड वातावरणातून एकदम सामान्य
वातावरणात आणल्याने त्याच्या प्रकृतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. पुढील
चोवीस ते अठ्ठेचाळीस तास त्याच्या प्रकृतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण
ठरणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.