प्रत्येक जिल्ह्यात अत्याधुनिक विज्ञान प्रयोग शाळा सुरु करणार - मुख्यमंत्री

बातमी
संशोधन पुनरुत्थानावर तीन दिवस आंतरराष्ट्रीय परिषदेत चर्चा
117 शोध निबंध सादर होणार

नागपूर :
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा सुरु करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. व्हीएनआयटीच्या सभागृहात तीन दिवस चालणाऱ्या संशोधन पुनरुत्थान या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री बोलत होते. परिषदेचे उद्घाटन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी केले.

समारंभास नागपूर विद्यापीठ, अमरावती विद्यापीठ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, संस्कृत विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अनिरुद्ध देशपांडे, व्हीएनआयटीचे संचालक विश्राम जामदार उपस्थित होते. भारतीय शिक्षण मंडळातर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, जुन्या विकासात्मक परंपरेचा जेव्हा आपल्याला विसर पडतो. तेव्हा ज्ञानाचा विस्तार बंद होतो. त्यामुळे समाजाची हानी होते. त्या हानीही भारतीय समाजाने सहन केल्यात या साठीच आता संशोधनाची प्रक्रिया सतत आवश्यक आहे. संशोधन हे सकारात्मक दिशेने गेल्यास समाजासाठी ते उपयोगी ठरते. समाजाच्या विकासासाठी जे उपयोगी आहे ते स्वीकारणे म्हणजेच संशोधन आहे.

मराठवाड्यात वारंवार पडणाऱ्या दुष्काळाविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, राज्यासमोर दुष्काळाचे मोठे आव्हान आहे. यासाठी या संकटाला सामोरे जाण्याचे प्रयत्न सुरु आहे. राज्यात फक्त 18 टक्के सिंचनाची सोय आहे. 82 टक्के शेती ही पावसावर अवलंबून आहे. ही परिस्थिती बदलवायची असेल तर पारंपरिक सिंचन व्यवस्था उपयोगी पडू शकते. सामान्य शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देणे ही शासनाची प्राथमिकता आहे. यासाठी संशोधनाची आवश्यकता आहे. आज जलसंधारणाची मोहिम राज्यात प्रभावीपणे राबविल्यामुळे 6 लाख हेक्टर जमिनीला सिंचनाची सोय होऊ शकली.

निर्सगाने आपल्याला जे दिले. त्याला समजून घेतल्यास शाश्वत विकासाकडे आपण जाऊ शकतो. विनाश थांबवू शकतो. निसर्गाचे सतत दोहन केल्यास त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. विज्ञान जीवनापयोगी व्हावे यासाठी संशोधन होणे आवश्यक आहे. या परिषदेत जी चर्चा होईल त्या चर्चेतील ज्ञानाचा उपयोग निश्चितपणे दिशा देणारा असेल. या संशोधनाच्या माध्यमातून शिक्षणाच्या विस्तारासाठी निश्चित एक धोरण तयार करण्यात येईल अशी ग्वाही ही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

ते म्हणाले की, आज जगात ज्या गोष्टीवर मोठ्या प्रमाणात चर्चा होऊन त्यावर चिंता व्यक्त केली जात आहे. तो प्रदूषणाचा विषय असून ज्या देशांनी जगाला प्रदूषित केले ते आज ज्ञानाची भाषा करत आहे. परंतू ज्या देशांनी जगाला प्रदूषित केले नाही त्यांनी पुढेही करु नये.

लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल आणण्यासाठी अनेक पातळ्यावर संशोधन कार्य केल्यास त्याला सामाजिक चळवळीचे स्वरुप येईल, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी केले. देशाच्या ग्रामीण क्षेत्रामध्येही विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण संशोधन होत असते मात्र इंग्रजी भाषेच्या अडचणीमुळे ते देशपातळी व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचू शकत नाही. कल्पक संशोधक आणि संशोधन करणाऱ्या संस्था यांच्यात सेतू निर्माण करण्याची गरज असल्याचेही स्मृती इराणी नमूद केले.

ज्येष्ठ शिक्षणतज्‍ज्ञ अनिरुद्ध देशपांडे म्हणाले की, समाजात मोठ्या प्रमाणात संशोधन पुररुत्थानाची आवश्यकता असून गेल्या पंचवीस वर्षात विज्ञान तंत्रज्ञानात मोठे परिवर्तन झालेले आहे. ते मानावाच्या कल्याणासाठी आहे. माहिती व तंत्रज्ञानात झालेले बदल पाहता चार वर्षाचा मुलगाही जगाची माहिती सांगू शकतो. माहिती तंत्रज्ञानाबरोबरच संशोधनाची गरज आहे. सजगता ठेऊन अनुसंधानाची निर्मिती करणे गरजेचे असून ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.

प्रास्ताविक खासदार अजय संचेती यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन उज्ज्वला चक्रदेव यांनी केले. या समारंभास आमदार नागो गाणार, विभागीय आयुक्त अनूप कुमार, बनवारीलाल पुरोहित व इतर शिक्षणतज्ज्ञ उपस्थित होते.