समाधान योजनेतून शासन जनतेपर्यंत पोहचते - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


बातमी
वडनेर येथील समाधान शिबिराचे उद्घाटन
18 प्रकारच्या योजनांचा 36 हजार नागरिकांना थेट लाभ
वर्धा, यवतमाळसाठी लवकरच टेक्सटाईल पार्क

वर्धा :
सामान्य जनतेला शासकीय कामांसाठी यापुढे सरकारी कार्यालयात चकरा मारव्या लागणार नाही. समाधान शिबिराच्या माध्यमातून शासन जनतेपर्यंत पोहोचत आहे. हिंगणघाट मतदारसंघात 36 हजार नागरिकांना विविध योजनांचा लाभ देऊन राज्यात नवीन विक्रम तयार केला आहे. समाधान शिबिराचा हा उपक्रम राज्यात प्रभावीपणे राबवू, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

महाराजस्व अभियानांतर्गत हिंगणघाट तालुक्यातील वडेनर येथे समाधान शिबिर व शासकीय योजनांच्या लाभ वाटपाचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष चित्रा रणनवरे, खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीणा आदी उपस्थित होते.

शासनाच्या विविध योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासोबतच संपूर्ण प्रशासन लोकाभिमुख करण्यासाठी समाधान शिबिर आयोजनाची सुरूवात करण्यात आली. जात प्रमाणपत्रासह, शेतकरी, शेतमजूर, अपंग, ज्येष्ठ नागरिक आदींना 18 प्रकारच्या योजनांचा लाभ देण्यासाठी हिंगणघाट मतदारसंघात आमदार समीर कुणावार यांनी या उपक्रमाचे आयोजन केले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, समाधान शिबीरामुळे हे जनतेचे प्रशासन असल्याची ग्वाही मिळते. राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून यापुढे मागेल त्याला शेततळे या उपक्रमांतर्गत पाच लाख शेततळी निर्माण करण्यात येणार आहेत.

हिंगणघाट कापसाची मोठी बाजारपेठ असल्यामुळे वर्धा व यवतमाळ जिल्ह्याचा समन्वय करून येथे टेक्सटाईल पार्क सुरू करण्यात येईल. शेतकरी कष्टाने उत्पादन करतो परंतु त्याला दलालाच्या माध्यमातून मालाची विक्री करावी लागते. हे थांबविण्यासाठी कृषी उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्यासाठीचे प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये रामदेवबाबा 1 हजार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक विदर्भात करणार असून कोका कोला ही कंपनी सुद्धा संत्र्यावर प्रक्रिया करणारा उद्योग उभारणार असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

आजनसरा बॅरेज प्रकल्पाला निधी

आजनसरा बॅरेज हा प्रकल्प 100 ते 125 गावातील सिंचनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण प्रकल्प असून या प्रकल्पाला 2005 मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली. परंतु अद्यापपर्यंत भूसंपादन व वन जमिनीमुळे प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाला येत्या अर्थसंकल्पात निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

ग्रामीण भागाच्या विकासासाठी रस्ते हे समृद्धीचे मार्ग आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत विकास पोहोचवयाचा असेल तर पांदणरस्ते बांधणे अत्यंत आवश्यक असून यासाठी अमरावती जिल्ह्याच्या धरतीवर पालकमंत्री पांदण रस्ता हा उपक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री यांनी सांगितले. अमरावती जिल्ह्यात लोकसहभागातून 1 वर्षात 3 हजार 500 पांदण रस्ते पूर्ण होणार आहेत. हाच अमरावती पॅटर्न राज्यातही राबविण्यात येणार आहे.

सर्वांसाठी घरे हा महत्त्वकांक्षी कार्यक्रम राज्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार असून ग्रामीणभागात जमिनीचा पट्टा नाही म्हणून घरकुलाचा लाभ मिळणार नाही, यासाठी गावात अतिक्रमण करून राहत असलेल्या कुटुंबांना मदत करण्यासंदर्भात एक महिन्यात निर्णय घेण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांना भोगवाटदार जमीन 2 चे जमीन 1 मध्ये करण्याचा कायदा यामध्ये बदल करण्यात येणार आहे.

ड्रायपोर्टसाठी एक महिन्यात जमीन

सिंदी रेल्वे येथे प्रस्तावित असलेल्या ड्रायपोर्टसाठी जमिनीची अडचण निर्माण झाली असून येत्या एक महिन्यात या जमिनीसंदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांना दिले. वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येत्या एक महिन्यात सुरू करून शेतकऱ्यांना बँकेच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगताना श्री. फडणवीस म्हणाले, एक वर्षापासून ही बँक सुरू व्हावी यासाठी 130 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. ही बँक सुरळीत चालावी अशी भूमिका आहे.

यावेळी आमदार कुणावार, खासदार रामदास तडस, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष चित्रा रणनवरे, जिल्हा परिषद सदस्य वसंतराव आंबटकर यांनीही विचार व्यक्त केले.

समाधान शिबिराच्या माध्यमातून जनतेला शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते आमदार समीर कुणावार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रशासनाने उत्तमरित्या जनतेला सेवा दिल्याबद्दल जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, उपविभागीय अधिकारी घनश्याम भूगावकर, तहसीलदार दीपक कारंडे, समुद्रपूरचे तहसीलदार सचिन यादव यांचाही शाल, श्रीफळ, चरखा देऊन गौरव करण्यात आला.

प्रारंभी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी स्वागत करून समाधान शिबिरामागील भूमिका विषद केली. यामध्ये त्यांनी समाधान शिबिराच्या माध्यमातून जिल्ह्यातील जनतेला विविध प्रकारच्यासेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत असून सर्व विभागांच्या योजना या समाधान शिबिरातून लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात आल्या. तसेच जलयुक्त शिवार आणि शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने अन्नधान्य आदी योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे प्रास्ताविकात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर दिघे यांनी तर आभार प्रदर्शन उपविभागीय अधिकारी घनश्याम भूगावकर यांनी केले.

लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्याहस्ते योजनेचा लाभ

शिबिरात 15 हजार 204 लाभार्थ्यांना 18 प्रकारच्या विविध योजनांचा थेट लाभ देण्यात आला. प्रातिनिधिक स्वरुपात श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेंतर्गत पिपरीच्या गुलाबराव तिजारे, शेकापूर (बाई)च्या सुशीला खेकारे, श्रावणबाळ (पारधी) योजनेमध्ये पिपरीच्या बुखारी बोसले, संजय गांधी निराधार योजनेंतर्गत वाघोलीच्या नर्मदा बुरांडे, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा बोपापुरचे योगेश नासरे, ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र शेकापूर (बाई) येथील वच्छलाबाई वाघमारे, वर्ग दोन मधून वर्ग एकमध्ये जमीन रुपांतर करण्याचा वाघोलीचे दीपक सहारे, ढिवरी पिपरीचे श्रीगणेश परसोडकर यांना तर कुळ खारिजा करण्याचे आदेश नरसिंगपुरच्या मनोहर ढगे, शिधापत्रिका चिंचोलीच्या (अपंग) पार्वताबाई दांडगे, वडनेरच्या पुष्पा जोगे यांना मुख्यमंत्री यांच्या देण्यात आले.

तसेच जात प्रमाणपत्राच्या वितरणामध्ये नि.मु. घटवाई कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र सातपुते यांना, प्रॉपर्टी कार्ड वाटपात हिंगणघाटचे अनिल मावळे, सौर कृषी पंप योजनेचा लाभ वणीचे संजय घोरपडे, तर कृषी पंपचा वडनेरचे नामदेव कारकुले, तर समाजकल्याण विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या योजनेतील मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ शेकापूर बाईचे संत गाडगेबाबा शेतकरी बचतगटातर्फे देविदास पाटील यांना तर जमीन सुपिकता निर्देशांक प्रमाणपत्र वडनेरचे विनोद वानखेडे, चष्मे वाटपात हफीज खान गौस खान पठाण यांनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते प्रातिनिधिक स्वरूपात ला़भ देण्यात आला