गुंतवणुकीची सर्वोत्तम संधी असल्याने एक पाऊल पुढे टाका- पंतप्रधानांचे उद्योजकांना आवाहन

बातमी
मेक इन इंडिया सप्ताहाचा शुभारंभ

मुंबई :
उत्तम पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ, तरुणांची मोठी संख्या, सुलभ परवानगी प्रक्रिया यामुळे भारताच्या आर्थिक विकासाचा वेग झपाट्याने वाढत आहे. भारतात उद्योग सुरु करण्याची हीच सर्वोत्तम वेळ आहे. ही संधी ओळखून ‘मेक इन इंडिया’ साठी एक पाऊल पुढे टाका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया येथे आयोजित 'मेक इन इंडिया' सप्ताहाचा शुभारंभ करताना पंतप्रधान बोलत होते. यावेळी स्वीडनचे पंतप्रधान कैल स्टीफन, फिनलँडचे पंतप्रधान जुहा पैट्री सिपिला, केंद्रीय उद्योग राज्यमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन, राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

पंतप्रधान श्री. मोदी म्हणाले, भारतातील एकूण लोकसंख्येतील 60 टक्के लोकांचे वय 35 वर्षे आहे. त्यामुळे उद्योग धंद्यासाठी लागणारे मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. उद्योग सुरु करताना कमीत कमी परवाने लागावे म्हणून अतिशय पारदर्शी असे उद्योग धोरण तयार केलेले आहे. उद्योगासाठी लागणारे पाणी, वीज, मनुष्यबळ या सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून वाहतुकीसाठी चांगले रस्ते, उत्तम निर्यात केंद्रे आहेत. त्यामुळे आपण एक पाऊल पुढे टाका, आम्ही दोन पावले पुढे टाकतो. याचा फायदा जगभरातील उद्योग समुहांनी घेतला पाहिजे. रस्ते, रेल्वे, मेट्रो, विमानतळ, स्मार्ट सिटी, कृषी, जलसिंचन, माहिती तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. जगातील अन्य देशांप्रमाणे येथेही उत्तम प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. स्टार्ट अप इंडिया, डिजीटल इंडियासाठी उत्तम कौशल्य दाखवण्याची ही एक संधी आहे.

बँक कर्जासंदर्भात ते म्हणाले, मुद्रा योजनेमार्फत बेरोजगार तरुण, महिलांना, अनुसूचित जाती-जमातीच्या तरुणांना उद्योग उभारण्यासाठी कर्ज देण्याची व्यवस्था केली आहे. नव्या उद्योजकांना अनेक सोयी सवलती देऊन कर्जाच्या योजना खुल्या केल्या आहेत. गेल्या वर्षी उत्पादन निर्मितीचा वेग 1.7 टक्के होता. तो या वर्षी 12.6 टक्क्यांवर गेला आहे. आज अनेक मोबाईल कंपन्या, इलेक्ट्रॉनिक कंपन्यांनी भारतामध्ये आपले उत्पादन सुरु केले आहे. त्यामुळे भारतीयांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र हे विविध उद्योग धंद्यात आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी सर्वोत्तम राज्य असून ‘मेक इन महाराष्ट्र’ साठी जगभरातील उद्योजक गुंतवणुकीसाठी उत्सुक आहेत. ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाच्या निमित्ताने ही संधी उपलब्ध झाली आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. महाराष्ट्र सरकारने माहिती तंत्रज्ञान, पर्यटन अशा अनेक विभागाचे धोरण ठरवले आहे. त्याचा चांगला परिणाम दिसून येत असून स्टरलाईट, कोकाकोला, रेमंड अशा अनेक उद्योग समूहांनी गुंतवणूक करार केले आहेत. तर अनेक उद्योग समूह गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत आहेत. जगभरच्या उद्योजकांनी महाराष्ट्रात यावे म्हणून आंतरराष्ट्रीय वित्तिय सुविधा केंद्र सुरु करीत आहोत.

स्विडनचे पंतप्रधान कैल स्टिफन म्हणाले, भारतात आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी चांगले वातावरण आहे. उत्तम सोयी सुविधा आहेत. भारत हा सर्वात मोठा लोकशाहीवादी आणि प्रगतीशील देश आहे. म्हणूनच स्वीडन देश मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करणार आहे. स्वीडन माहिती तंत्रज्ञान, संशोधन क्षेत्रासाठी मदत करेल. ‘मेक इन इंडिया’ हा त्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आहे.

फिनलँडचे पंतप्रधान जुहा सिपिला म्हणाले, फिनलँड अनेक करार करणार आहे. भारताने आर्थिक व औद्योगिक धोरणात खूपच लवचिकता आणल्याने गुंतवणूक करण्याची संधी सोडणार नाही.

केंद्रीय उद्योग राज्यमंत्री श्रीमती सीतारामन म्हणाल्या, भारताने जगभरच्या उद्योग समुहाला एक नवे दालन खुले केले आहे. या देशाची प्रतिमा झपाट्याने बदलत आहे. अनेक क्षेत्रात क्षमता वाढलेली आहे. मेक इन इंडिया वीकच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी.

याच कार्यक्रमात पंतप्रधानाच्या हस्ते टाईम इंडिया ॲवार्ड, टाटा आणि अजंता फार्मास्युटिकल्स या उद्योग समुहांना देण्यात आले. तसेच एका उद्योग आर्थिक अहवालाचे विमोचन करण्यात आले. प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात सांस्कृतिक कार्यक्रमाने होऊन स्वागत गीत सादर करण्यात आले. कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सदस्य, विविध देशांचे राजदूत, उद्योगपती मोठ्या संख्येने उपस्थित होते.