संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानासस्थगिती नाही नवीन निकषांसह आता नवे स्वरूप


     संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानास स्थगिती मिळाल्याबाबतच्या चुकीच्या बातम्या काही वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाल्या आहेत. तथापि, हे अभियान सुरुच असून, ते अधिक व्यापक स्वरुपात राबविण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण पाणी पुरवठा विभागाने केले आहे. 
                                      

     मुंबई,  : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानास नवीन निकषांसह नवे स्वरूप देण्यात येत असून, हे अभियान आता अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. या अभियानास स्थगिती देण्यात आलेली नाही, असे स्पष्टीकरण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे देण्यात आले आहे.
     ग्रामीण स्वच्छतेच्या कार्यक्रमाचा मूळ उद्देश हा ग्रामीण जनतेचे आरोग्यमान हा असून त्या अनुषंगाने ग्रामीण जनतेचे आरोग्यमान पर्यायाने जीवनस्तर उंचावण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.  संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातील काही घटक हे केंद्र शासनाच्या निर्मल ग्राम पुरस्कार योजनेवर आधारित होते. केंद्र शासनाने ही योजना 2015-16 पासून बंद केली आहे. त्यामुळे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातसुध्दा बदल करणे आवश्यक झाले आहे. तसेच केंद्र शासनाकडून निर्मल भारत अभियानाच्या निकषांमध्ये व नावात बदल करून दि. 2 ऑक्टोबर 2014 पासून स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमाच्या उद्दिष्टानुसार दि. 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत राज्याच्या ग्रामीण भागातील जनतेसाठी मोठ्या प्रमाणात वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम करुन राज्यातील संपूर्ण ग्रामीण भाग हागणदारीमुक्त करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. 
यात गावांतील संपूर्ण परिसर स्वच्छता शाश्वतपणे प्राप्त करणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. पूर्ण गाव हागणदारीमुक्त होण्यासाठी गावातील शाळा, अंगणवाडी आदी पूर्णपणे स्वच्छ असणे अनिवार्य आहे. यामुळे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या निकषात बदल करणे आवश्यक झाले आहे.
महाराष्ट्रात सुमारे 27,000 ग्रामपंचायती असून, त्यातील सर्व गावे हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट असल्याने या अभियानाची व्याप्ती व स्वरुप खूपच मोठे आहे. तसेच हे संपूर्ण ग्रामीण क्षेत्र मर्यादित कालावधीत हागणदारीमुक्त करावयाचे असल्याने ही कार्यवाही सूत्रबद्ध पद्धतीने करण्यासाठी विस्तृत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यांचे स्वरुप पाहता अभियानाच्या तरतुदींमध्ये बदल करणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे सर्वंकष विचारातून यथोचित निर्णय घेण्यासाठी संत गाडगेबाबा अभियानाच्या केवळ तपासणी प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली असून, ही योजना बंद करण्याचा कोणताही विचार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
     स्वच्छ भारत मिशन- ग्रामीण या अभियानास पूरक अशी संत गाडगेबाबा  ग्राम स्वच्छता अभियान नवीन निकषांसह 2016-17 पासून सुरु ठेवण्यात येईल आणि त्यासाठी आवश्यक त्या निधीची तरतूदही करण्यात आली आहे, असेही स्पष्टीकरणात नमूद करण्यात आले आहे.
० ०