मुबंई.. अमेरिकेहून परतल्यानंतर राष्ट्रवादीचे
नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ‘ईडी’च्या
कारवाईवर संशय घेतला. तसंच, आमच्यावरील सर्व आरोप चुकीचे आणि बिनबुडाचे
आहेत, महाराष्ट्र सदन बांधकामात कुठेही भ्रष्टाचार झालेला नाही असं
सांगताना महाराष्ट्र सदनसह सर्व संबंधित निर्णय सगळ्या खात्यांच्या संमतीनं
आणि मुख्यमंत्र्यांच्या सहीनं झाल्याची बाजू मांडत छगन
भुजबळ यांनी आपल्यावर असलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
भुजबळ यांनी आपल्यावर असलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
छगन भुजबळ यांनी मुंबईतील राष्ट्रवादी
कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र सदन, कालिनातील भूखंड आणि आर्थिक
अफरातफर यांवरून होत असलेले सर्व आरोप फेटाळून लावले. यावेळी मोठ्या
प्रमाणात भुजबळ समर्थकांनी गर्दी केली होती. यावेळी कायदा-सुव्यवस्थेचा
प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस
कार्यालयाच्या परिसरात जमावबंदी आदेश जारी केला होता.
31 तारखेला मी अमेरिकेला रवाना झालो, पण
इथं माझ्याबाबत अफवा पसरवल्या गेल्या. भुजबळ ऐनवेळी पळून गेले. आता ते परत
येतील की येणारच नाहीत, अशा अनेक वावड्या पिकवण्यात आल्या. पण या
वृत्तांमध्ये कोणतंही तथ्य नाही. मी कुठेही पळून गेलेलो नव्हतो. तसा
प्रश्नच येत नाही, असं भुजबळ यांनी स्पष्ट केलं. माझा अमेरिका दौरा
पूर्वनियोजित होता. 25 नोव्हेंबर 2015 रोजी मला सिनेट मेंबर्स ऑफ
काँग्रेसने आमंत्रण पाठवलं होतं. त्यानुसार 3 दिवसांच्या परिषदेसाठी मी 31
जानेवारीच्या रात्री अमेरिकेला रवाना झालो. माझ्यावर जूनमध्ये एफआयआर दाखल
झाला आहे. एखाद्याला पळून जायचं असेल तर तो एवढे महिने थांबेल का, असा
सवालही भुजबळ यांनी केला.