रिपोर्टर मुंबई........ महापौर बंग
ला हा प्रथम नागरिक महापौरांसाठी असतो. त्या ठिकाणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक होऊ शकत नाही. महापौर बंगला बळकावण्यासाठी शिवसेनेनं हा घाट घातलाय असा आरोप करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडाडून विरोध केलाय. महापौर बंगला ही पळवाट आहे. जर बाळासाहेबांचं स्मारक उभारायचं असेल तर दादरच्या म्युनिसिपल क्लबमध्ये व्हावं असा सल्लाही राज यांनी दिला.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज तिसरी पुण्यतिथी. त्यानिमित्ताने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन स्मारक महापौर बंगल्यातच होईल अशी घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी घोषणा करून काही तास उलटत नाही. तेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन स्मारकाला कडाडून विरोध केला. आज यांच्या हाती सत्ता आहे म्हणून हे कुठेही स्मारक उभारतील. मुळात महापौर बंगला हा महापौरांसाठीच आहे. उद्या मुख्यमंत्री, वर्षा बंगल्यावर किंवा राजभवनात स्मारक उभारतील. पण ज्या प्रमाणे बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळाली तशीच मोठी जागा बाळासाहेबांच्या स्मारकासाठी मिळाली पाहिजे अशी मागणी राज ठाकरेंनी केली.

मुंबईत खासदार, आमदार मंत्र्यांना जागा मिळते मग बाळासाहेबांच्या स्मारकासाठी का नाही ? असा सवाल उपस्थित करत दादरच्या म्युनिसिपल क्लबमध्ये स्मारक व्हावं असा सल्लाही त्यांनी दिला. शिवसेनेची सत्ता आहे त्यांना मुंबईत इतर ठिकाणी जागा मिळू शकत नाही का ?, मुळात शिवसेनेनं महापौर बंगला बळकावण्यासाठी हा खटाटोप सुरू आहे अशी टीकाही राज यांनी केली. माझा स्मारकाला विरोध नाही. पण, स्मारक लोक उपयोगी व्हावं, भव्यदिव्य असं स्मारक व्हावं पण त्यासाठी महापौर बंगला ही योग्य जागा नाही असंही राज यांनी स्पष्ट केलं.
तसंच मागील वर्षी मी बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिवतीर्थावर गेलो होते पण तिथे गेल्यावर पक्षाच्या घोषणा दिल्या जातात. हे योग्य नाही. अशावेळी पक्षाचा घोषणा देण्याची गरजच नाही. मला ते मुळीच पटत नाही. त्यामुळे आज शिवतीर्थावर गेलो नाही असा खुलासाही राज ठाकरेंनी केला.