औद्योगिक वसाहतीत आढळले ३३ परप्रांतीय


उस्मानाबाद : शहरातील एमआयडीसी भागात दहशतवाद विरोधी विभागाच्या (एटीसी) पथकाने शुक्रवारी दुपारी कारवाई केली. त्यावेळी दोन कंपन्यांमध्ये ३0 तर एका घरात भाड्याने राहणारे तीन परप्रांतीय इसम आढळून आले.
परप्रांतीय इसमांना कामावर ठेवणे किंवा किरायाने जागा दिल्याची माहिती पोलिसांना देण्याबाबत अपर जिल्हा दंडाधिकार्‍यांनी सक्तीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, जिल्ह्यातील अनेक उद्योगासह विविध दुकानात अनेक परप्रांतीय कामाला आहेत. पोलीस मुख्यालयांतर्गतच्या दहशतवाद विरोधी विभागाचे सपोनि विनोद चव्हाण व त्यांच्या सहकार्‍यांनी शुक्रवारी दुपारी एमआयडीसीतील राजकुमार जयकुमार आजमेरा यांच्या जे.के.इंडस्ट्रीजवर कारवाई केली. त्यावेळी तेथे जिलेसिंह निरपतसिंह बघेल (वय-५४ रा. कुदवारी जि.शिवनी मध्यप्रदेश) याच्यासह इतर १२ परप्रांतीय कामाला असल्याचे आढळून आले. तसेच योगिता निलम आजमेरा यांच्या कांचन पॉवर ट्रान्स्फार्मर कंपनीवर केलेल्या कारवाईत सुदर्शन रामजी पासवान (वय-३८ रा. निरंजनपूर जि.रोहतास बिहार) याच्यासह इतर १३ परप्रांतीय आढळून आले. तर एमआयडीसी भागातील सुरेश विठ्ठल म्हेत्रे यांच्या घरी जनार्धन सोमन पासवान (रा. नवलपूरवा जि.गोरखपूर उत्तरप्रदेश) हा इसम आढळून आला. याबाबत पथकातील सपोउपनि मोममद शेख यांच्या फिर्यादीवरून कांचन पॉवर ट्रान्स्फार्मर कंपनीचे चालक हेमंत शरद पांडे, हवालदार आशपाक मोमीन यांच्या फिर्यादीवरून जे.के.इन्डस्ट्रीजचे चालक मनोज विलास कुलकर्णी यांच्याविरूध्द व हवालदार निलप्पा सगरे यांच्या फिर्यादीवरून घरमालक सुरेश विठ्ठल म्हेत्रे यांच्याविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.