नवी दिल्ली: ‘तुम्ही जबाबदार नागरीक असाल तर आधी पोलिसांकडे आत्मसमर्पण करा आणि नंतर न्यायालयात येऊन तुमचे म्हणणे मांडा; असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाचे नेते सोमनाथ भारती यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यांना आज दि. २८ सप्टेबर रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले.
भारती यांच्या पत्नी लिपिका मित्रा यांनी त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न, कौटुंबिक अत्याचार आणि धमकाविण्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे आपण गर्भवती असताना भारती यांनी पाळीव कुत्र्याला आपल्या अंगावर सोडून आपल्याला इजा करण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर भारती यांनी उच्च व सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली. मात्र त्या ठिकाणी त्यांची डाळ शिजली नाही.
एकेकाळी भारती हे दिल्लीचे मंत्री असताना दोन आफ्रिकन महिलांवर अनाधिकाराने धाड घालून त्यांची पिळवणूक केल्याचा आरोप झाला होता. त्यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा असलेले अरविंद केजरीवाल यांनी ठामपणे भारती यांची पाठराखण केली होती. मात्र या प्रकरणी केजरीवाल यांनी भारती यांच्यापासूनचार हात लांब रहाणेच पसंत केले आहे. इतकेच नाहे; तर त्यांनी भारती यांना पोलिसांसमोर हजार होण्याचा सल्ला यापूर्वीच दिला होता.