२३ गावांतील शौचालय नसलेल्या कुटुंबांना नोटिसा  • तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतीपैकी २३ ग्रामपंचायतीकडून गावामध्ये शौचालय नसणाऱ्या कुटुंबांना नोटीसा बजावण्यात येत असून, उघड्यावर शौचालयास गेल्यास गुडमॉर्निंग पथकाकडून कारवाई झाल्यास ग्रामपंचायत जबाबदार राहणार नाही, असे नोटिसेत स्पष्ट करण्यात आले आहे.
    लोहारा तालुक्यात सध्या स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून स्वच्छतेतून समृद्धीचा ध्यास हाच आमचा ग्रामविकास याप्रमाणे तालुका हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प जि. प. व पं. स. ने केला. ही बाब चांगली असली तरी सध्याची परिस्थिती संकल्पासाठी फारशी अनुकुल नाही. लोहारा तालुक्यात यावर्षी मृग नक्षत्रात पाऊस झाला. पुढे पाऊस पडेल या आशेवर शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु, पावसाने दडी मारल्याने उगवलेली पिकेही वाळून जात आहेत. शेतकरी ऊस तोडून जनावरांपुढे टाकत आहेत. त्यातच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर आहे. साठवण तलाव, पाझर तलाव उन्हाळ्यातच आटले आहेत. माकणी निम्न तेरणा प्रकल्पातील पाणीही आटल्यात जमा आहे. त्यामुळे तालुक्यातील ४० गावांत पाणीटंचाई जाणवत आहे. पाण्यासाठी माणसांबरोबर जनावरांचीही पायपीट होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकरी, मजूर, व्यापारी यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. अशा परिस्थितीमध्ये जगायचे कसे? हाच प्रश्न सर्वांसमोर उभा आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने तालुक्यातील ४५ पैकी २३ ग्रामपंचायतीकडून शौचालय अधिनियम क्रमांक २२ कलम ११५, ११६ व ११७ नुसार सार्वजनिक ठिकाणी रस्त्यात किंवा रस्त्याजवळ उपद्रव, अस्वच्छता करणे, शौचालय बांधकाम न करणे आदी बाबींचा समावेश असलेल्या नोटिसा बजावण्यात येत आहेत. तसेच पोलिस अधिनियमानुसार १ हजार २०० रुपये दंड केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे उघड्यावर शौचास गेल्यास गुडमॉर्नींग पथकाकडून कारवाई झाल्यास ग्रामपंचायत जबाबदार राहणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ग्रामस्थही चांगलेच पेचात सापडले आहेत.
    एकीकडे प्रशासनाची नोटिसबाजी सुरू झाली आहे. तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. अशा परिस्थितीत शौचालयाचे बांधकाम करायचे कसे? असा प्रश्न ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे. जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीचे अधिकारी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेण्यास तयार नाहीत. कसल्याही परिस्थितीत शौचालयाचे बांधकाम झालेच पाहिजे, असे ठणकावून सांगण्यात येत आहे. यासंदर्भात गटविकास अधिकारी सुरेश शिवदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही.