सीमा सुरक्षा दलाच्या तुकडीवर दहशतवादी हल्ला करणा-या पाकिस्तानी दहशतवाद्याला जीवंत पकडण्यात यश आले

श्रीनगर, - जम्मू काश्मीरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या तुकडीवर दहशतवादी हल्ला करणा-या पाकिस्तानी दहशतवाद्याला जीवंत पकडण्यात यश आले असून या अटकेमुळे पाकविरोधात भारताच्या हाती एक मोठा पुरावा लागला आहे. कासीम उर्फ उस्मान खान असे या दहशतवाद्याचे नाव असून तो लष्कर ए तोयबाचा सदस्य असल्याचे समजते. 
जम्मूतील उधमपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी तिघा दहशतवाद्यांनी बीएसएफच्या तुकडीवर हल्ला केला होता. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले असून एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आले होते. हल्ला करणारे अन्य दोघे दहशतवादी घटनास्थळाजवळील गावात लपून सुरक्षा दलांवर गोळीबार करत होते. यातील उस्मान खान या दहशतवाद्याने विक्रमजीत व राकेशसह एकूण पाच जणांना ओलीस म्हणून वापरले. पाकिस्तानात जाण्याचा मार्ग मला सांगा, मी तुम्हाला सोडून देईन असे उस्मानने सांगितले. यादरम्यान मला खायला हवे असल्याचे उस्मान म्हणाला आणि त्याच वेळी संधी साधत विक्रमजीत व राकेशने त्याला निशस्त्र करुन ताब्यात घेतले. याच सुमारास लांबून पोलिस येताना दिसले तरीही मला सोडा, पाकिस्तानात जाऊ द्या अशी तो विनंती करत असल्याचे विक्रमजीतने सांगितले. परंतू, या बहादूर तरुणांनी उस्मानला पोलिसांच्या ताब्यात दिले. 
पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्याला जीवंत पकडण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी मुंबईवर हल्ला करणा-या अजमल कसाबला जीवंत पकडण्यात यश आले होते. आता उस्मानच्या अटकेमुळे पाकच्या भारतविरोधी कारवाया उघड होतील अशी आशा वर्तवली जात आहे. उस्मान हा आठवडाभरापूर्वीच पाकमधून भारतात आला होता. उस्मानकडून एके ४७ व जीवंत काडतूस जप्त करण्यात आले असून गुरदासपूरमधील हल्ल्यातही त्याचा सहभाग असल्याचे वृत्त आहे.
आम्ही सीमेवरील कुंपनाच्या वायर कापून जंगलाच्या रस्त्याने पाकिस्तानातून १२ दिवस आधी भारतात आलो, मात्र या कामाचे आम्हाला पैसे मिऴत नाहीत, असे उधमपूरमध्ये पकडलेल्या दहशतवादी कासीम उर्फ उस्मान खान याने सांगितले आहे. तसेच, अमरनाथ यात्रा हे हल्ल्याचे एक लक्ष्य होते असेही त्याने सांगितले आहे. आणखी दोन दहशतवादी भारतात घुसल्याचा संशय असून सुरक्षा रक्षक संपूर्ण परिसर पिंजून काढत आहेत. दरम्यान, याप्रकरणी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी दिली.