पाण्याचा कायमस्वरुपी प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेतकऱ्यांनी लोकसहभाग नोंदवावा - डॉ. दि. मा. मोरे


उस्मानाबाद : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यामध्ये आधुनिक पद्धतीने शेती, नवनवीन उद्योगाची निर्मिती, सामाजिक बंधुभाव निर्माण करुन संघटीत व्हावे. तसेच सामाजिक सलोखा प्रस्तापित करुन जलयुक्त शिवार योजनेत लोकसहभाग नोंदवावा, तरच जलयुक्त शिवारसारख्या योजना मार्गी लागून पाण्याचा कायमस्वरुपी प्रश्न सोडविता येऊ शकतो, असे प्रतिपादन जलतज्‍ज्ञ डॉ. दि.मा. मोरे यांनी केले.

तहसील कार्यालय, लोहारा, सिंचन सहयोग, तालुका कृषि अधिकारी कार्यालय व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने लोहारा येथे आयोजित जलयुक्त शिवार अभियानातंर्गत ‘आपण करु, या दुष्काळावर मात’ या विषयावर एक दिवशीय सिंचन संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. मोरे बोलत होते. अध्यक्षस्थानी लोहारा पंचायत समितीचे सभापती असिफ मुल्ला होते. यावेळी शेतीतज्‍ज्ञ अंकुश पडवळ, पुणे येथील जलतज्‍ज्ञ डॉ.सुधीर भोंगळे, उमरगा उपविभागीय अधिकारी नि.भा. श्रींगी, उपविभागीय कृषि अधिकारी यु.बी. बिराजदार, तहसीलदार ज्योती चव्हाण, तालुका कृषी अधिकारी ए.डब्ल्यू. कुलकर्णी, राजशेखर पाटील, ॲड.अमोल रणदिवे, बालाजी पवार आदी उपस्थित होते.

श्री.मोरे म्हणाले, या भागातील शेतकरी हे निसर्गावर आधारित शेती करतात. मागील काही वर्षांपासून पावसाची अनियमितता वाढत असल्याने त्याचा फटका उत्पादन वाढीवर होत आहे. पाणी पातळी कमी झाल्याने दुष्काळासारख्या परिस्थितीला तोंड देण्याची वेळ येत आहे. शेतीचे शास्त्र जाणून घेऊन पावसाच्या अनियमिततेपुढे न झुकता आधुनिक पद्धतीने शेती करावी. पाण्याची बचत करताना ऊस विरहित पीक पद्धतीचा वापर करुन आवश्यक तेवढेच पाणी ठिंबक व तुषार पद्धतीने पाणी दिले पाहिजे. जास्तीचे पाणी उपलब्ध असेल तर पर्यटनासारखे क्षेत्र निर्माण करुन आर्थिक उन्नती करावी. ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी सोयाबीन, कापूस यासारख्या शेतीतील उत्पादनावर प्रक्रिया करणारे उद्योग व अन्य लघु उद्योग तसेच सेवाक्षेत्र सारखे उद्योग रोजगार निर्मितीसाठी आवश्यक आहेत, त्यामुळे शहराकडे होणारे स्थलांतर रोखता येईल.

यावेळी श्री.पडवळ, डॉ.भोंगळे यांनी मनोगत व्यक्त केले.