जलयुक्त शिवार अभियान : शासकीय यंत्रणा आणि लोकसहभागाद्वारे 143 प्रकल्पाची कामे


उस्मानाबाद : जिल्ह्यात सुरु असलेले जलयुक्त शिवार अभियानाचे काम आता अधिक गतीने सुरु असून याअंतर्गत सध्या विविध यंत्रणांमार्फत ७ हजार १९५ कामे सुरु असून त्यापैकी ३ हजार ३१३ कामे पूर्ण झाली आहेत. यात विशेष म्हणजे जिल्ह्यातील १४३ प्रकल्पातून शासकीय यंत्रणा आणि लोकसहभागाद्वारे तब्बल १७ लाख ५३ हजार ४२१ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. यामुळे या प्रकल्पातील पाणीसाठ्यातही वाढ होणार असून काढलेला गाळ शेतात टाकल्याने त्याची सुपीकता वाढण्यास मदत होणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात हे अभियान राबविले जात आहे. कृषी, जलसंधारण, जलसंपदा, सामाजिक वनीकरण, पाटबंधारे, भूजल सर्वेक्षण आणि जिल्हा परिषद या यंत्रणेमार्फत विविध ठिकाणी ही कामे सुरु आहेत. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्यासाठी या विविध यंत्रणांना आता अधिक गतीने काम करण्याबाबतच्या सूचना डॉ. नारनवरे यांनी दिल्या आहेत. प्रत्येक काम हे वेळेवर आणि दर्जात्मक व्हावे, यासाठी त्यांचा आग्रह असून विविध ठिकाणच्या कामांना अचानक भेटी देऊन तेथील कामांची ते तपासणी करीत असल्याने यंत्रणाही सतर्क राहून काम करीत आहेत.

जलयुक्त शिवार अभियानाची उपयुक्तता पटू लागल्याने प्रत्येक गावातून तरुण शेतकरी, शेतकरी गटांचे सदस्य आणि तरुण मंडळांचे पदाधिकारी सहभागी होत आहेत. त्यामुळे या अभियानातील गावाव्यतिरिक्त इतर गावांनीही आता लोकसहभागातून कामे सुरु केली आहेत.