तक्रारीनंतर शासकीय वाहनातून नेले..अन् हाताला काम दिले..!उस्मानाबाद : जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या लोकशाही दिनामध्ये टार्च केलेल्या कपड्यातील एका माजी सरपंचाने ‘रोहयोअंतर्गत काम मिळत नाही’, अशी तक्रार केली. मात्र, तक्रारीच्या सत्यतेबाबत जिल्हाधिकाऱ्यांना संशय आला. त्यावर ‘तक्रारदारास खरोखर कामाची गरज आहे की नाही’, हे पडताळण्यासाठी संबंधितासोबत गटविकास अधिकाऱ्यांना पाठविले. शासकीय वाहनातून गावामध्ये नेले. त्यांच्या मागणीनुसार काम दिले. काम न केल्यास कारवाईची तंबी दिली. त्यामुळे सदरील माजी सरपंच आता दररोज कामावर चालले आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या उपस्थित लोकशाही दिनाला सुरूवात झाल्यानंतर काहीजणांनी वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी नोंदविल्या. त्यानंतर भूम तालुक्यातील सोनगिरी येथील माजी सरपंचानी तक्रार मांडली. रोजगार हमी अंतर्गत कामाची मागणी करूनही पंचायत समिती आणि तहसील प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यावर डॉ. नारनवरे यंनी ‘आपण काय करता’? असा प्रश्न केला असता ‘शेती’ असे उत्तर दिले. ‘किती शेती आहे? अशी विचारणा केली असता ‘दहा एकर’ असे सांगण्यात आले. संबंधित माजी सरपंचाच्या अंगावर टार्च केलेले कपडेही होते. त्यामुळे डॉ. नारनवरे यांना तक्रारीच्या सत्यतेबाबत शंका आली. त्यावर डॉ. नारनवरे यांनी संबंधित तक्रारदारासोबत गावामध्ये जावून काम उपलब्ध करून देण्याचे आदेश बीडीओंना दिले. ‘अन् काम उपलब्ध करून दिल्यानंतरही कामावर न गेल्यास प्रशासनाची दिशाभूल केली, म्हणून पोलिस कारवाई करू’, अशी तंबीही दिली. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश येताच गटविकास अधिकारी माने यांनी संबंधित तक्रादारास शासकीय वाहनातून घेवून थेट सोनगिरी गाठले. तेथे गेल्यानंतर लागलीच काम उपलब्ध करून दिले. त्यानंतर कामाच्या ठिकाणचे फोटो काढून ते जिल्हाधिकाऱ्यांना व्हॉट्सअपवर पाठविले. आता सदरील माजी सरपंच दररोज ‘रोहयो’च्या कामावर जात आहेत. त्यांना कामाची गरज असेल तर काही अडचण नाही. परंतु, गरज नसेल तरीही जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशाप्रमाणे किमान दहा दिवस कामावर जावे लागणार आहे. अन्यथा पोलिस कारवाईला सामोरे जावे लागू शकते