कन्नडजवळ भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहा ठार


कन्नड, - औरंगाबादमधील कन्नड येथे भरधाव वेगात असलेल्या ट्रकने स्कॉर्पियोला धडक दिल्याने स्कॉर्पियोतील सहा जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी घडली. मृत्यू झालेले सर्व जण एकाच कुटुंबातील असून मृतांमध्ये महिला व लहान मुलीचा समावेश आहे.
कन्नडजवळील गावात राहणारं एक कुटुंब त्यांच्या लहान मुलीच्या उपचारासाठी गोव्याला गेलं होतं. आठवडाभर उपचार घेतल्यानंतर हे कुटुंब स्कॉर्पियो गाडीतून पुन्हा घरी परतण्यासाठी निघाले होते. रविवारी सकाळी साडे पाचच्या सुमारास हतनूर जवळ भरधाव वेगात असलेल्या ट्रकने स्कॉर्पियोला धडक दिली. या अपघातात स्कॉर्पियोतील चौघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दोघांचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृृत्यू झाल्याचे समजते. ज्या मुलीच्या उपचारासाठी हे कुटुंब गोव्याला गेले होते तीदेखील या अपघातात दगावल्याचे समजते. या अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर पसार झाला आहे. अपघातामुळे धुळे सोलापूर महामार्गावरील वाहतूक जवळपास दोन तास खोळंबली होती.