पक्षाचे जोडे बाजुला ठेवून आरक्षणाचा लढा लढणार धनगर समाजाच्या पदाधिकाऱ्यांचा बैठकीत निर्धार

। उस्मानाबाद
मागील ६५ वर्षापासून धनगर समाजाला एसटी प्रवर्गातील हक्काच्या आरक्षणापासून वंचित ठेऊन समाजावर सर्वच सत्ताधाऱ्यांनी अन्याय केला आहे. निवडणुकीपूर्वी आरक्षण मिळवून देण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजप सरकारकडूनही चालढकल सुरू आहे. आरक्षण पदरात पाडून घेण्यासाठी यापुढे पक्षाचे जोडे बाजुला ठेवून आरक्षणाचा लढा लढण्याचा निर्धार धनगर समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
    येथील शासकीय विश्रामगृहामध्ये शनिवारी (दि.७) धनगर समाजाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी येत्या २३ मार्चला काढण्यात येणाऱ्या मोर्चाबद्दल नियोजन करण्यात आले. या बैठकीस माजी आमदार प्रकाश शेंडगे, धनगर समाजोन्नती मंडळाचे राज्याचे संपर्कप्रमुख अभिमन्यू शेंडगे, माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भारत डोलारे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. खंडेराव चौरे, डॉ. गोविंद कोकाटे, रामकृष्ण रौंदाळे, राष्ट्रवादीच्या युवतीच्या मराठवाडा संघटक सक्षणा सलगर, रासपचे जिल्हाध्यक्ष आश्रुबा कोळेकर, तानाजी सोनटक्के आदी पदाधिकारी उपस्थित होते.
    यावेळी शेंडगे म्हणाले की, आत्तापर्यंतच्या शासनांनी धनगर समाजावर घोर अन्याय केला आहे. मागास असलेल्या या समाजाला झुलवत ठेवण्यात येत आहे. समाजाचा विकास साधण्यासाठी हक्काचे आरक्षण मिळणे आवश्यक आहे. शासनाने समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहु नये, आरक्षणासाठी येत्या २३ मार्चला विधानसभेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. समाजबांधवांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
भाजप सरकारवर टीका
 या बैठकीत उपस्थितांनी भाजप सरकारवर टीका केली. भाजपने धनगर समाजासह मुस्लिम समाजाचीही दिशाभूल केली आहे. खोटी आश्वासने देऊन धनगर समाजाचा पाठिंबा घेतला. परंतु, आरक्षणाची अमलबजावणी न केल्यास भाजप सरकारला याचे परिणाम निश्चतच भोगावे लागतील, असा इशारा धनगर समाजोन्नती मंडळाचे राज्याचे संपर्कप्रमुख अभिमन्यू शेंडगे यांनी दिला.

जिल्ह्यातून दहा हजार समाजबांधव जाणार
येत्या २३ मार्च रोजी विधानसभेवर आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्यातून सुमारे दोन लाख लोक यामध्ये सहभागी होणार असून, जिल्ह्यातून १० हजार समाजबांधव सहभागी होणार असल्याचे दत्ता बंडगर यांनी यावेळी सांगितले.


---------