आरविंद गोरे यांचा पॅनल दनदनित विजयी

उस्मानाबाद : तालुक्यातील केशेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सभासदांनी एकतर्फीच केलीच. विरोधकांना अस्मान दाखवून भूईसपाट करत सभासदांनी विद्यमान चेअरमन अरविंद गोरे यांच्या पॅननला दणदणीत विजयी केले. विकास कारखान्यासारखीच गत विरोधकांची आंबेडकरच्या निवडणूकीत झाली आहे.
केशेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीसाठी रविवार दि. ८ मार्च रोजी ९९ बुथवर मतदान घेण्यात आले होते. कारखान्याच्या ९ हजार ७५९ सभासदांपैकी ७८३८ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ८०.३२ टक्के मतदान झाले होते. आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील महसुल भवनात मतमोजणी करण्यात आली. मतमोजणीसाठी १४ टेबलची व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक टेबलवर एक बुथ याप्रमाणे एकाच वेळी १४ बुथची मोजणी सुरू झाली. सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. पण ती अत्यंत संथगतीने सुरू झाल्याने पहिल्या फेरीचा निकाल तब्बल दुपारी १ वाजता आणि दुस-या फेरीचा निकाल निवडणूक कर्मचा-यांची जेवणे झाल्यावर दुपारी ३ वाजता जाहीर करण्यात आला.
प्रत्येक फेरीच्या निकालात सत्ताधारी गोरे पॅनल व विरोधी पॅनलमध्ये प्रचंड तफावत दिसली. पाचव्या फेरी अखेर अरविंद गोरे पॅनलला ३००० ते ४००० एवढी मते मिळत गेली तर विरोधी अ‍ॅड. व्यंकट गुंड यांच्या पॅनलला ९०० ते ११०० आणि भाजप प्रणित संजय निंबाळकर यांच्या पॅनलला ७०० ते ९०० एवढी मते मिळत गेली. कारखान्याच्या सभासदांनी अवघ्या ३० टक्क्यांमध्येच विरोधकांचा गाशा गुंडाळून टाकला.
या निवडणूकीत विरोधकांनी बरीच हवा करण्याचा प्रयत्न केला. प्रारंभी विरोधी दोन्ही पॅनलनी एकत्र येण्याची चर्चा चालू होती. पण एकमेकांच्या पॅनलमधील हा नको, तो नको म्हणत विरोधकांनी एकत्र येण्याचा प्रयत्न फसला. तरीही दोन्ही पॅनलला संपूर्ण उमेदवार मिळाले नाहीत. निंबाळकर पॅनलकडे १९ तर गुंड पॅनलकडे १८ उमेदवार होते. गोेरे पॅनलची मात्र संपूर्ण उमेदवारांसह पक्की फिल्डींग होती. प्रचारात विरोधकांनी रान उठवण्याचा प्रयत्न केला. गुंड पॅनलने तर महादेव जानकर व सावंत यांना प्रचारात उतरवून त्यांना हेलीकॉप्टरची सफरही घडवून आणली. तर निंबाळकरांसाठी भाजपाचे नेते आ. सुभाष देशमुख येऊन गेले. गोरे पॅनलचा प्रचार हा एकहाती होता. संपूर्ण मदार अरविंद गोरे यांच्यावरच होती. आणि ती त्यांनी यशस्वी करून दाखविली.
रात्री उशिरापर्यंत मतमोजणीची प्रक्रिया सुरू होती. एका एका फेरीचा निकाल जाहीर होताच गोरे समर्थक जल्लोष करत होते.