एकात्मिक पाणलोट क्षेत्राच्या कामांचा नियोजनात्मक कृती आराखडा तयार करावा - उमाकांत दांगटउस्मानाबाद : एकात्मिक पाणलोट विकास हा जलयुक्त शिवार योजनेचा महत्त्वाचा पाया आहे. या अभियानातंर्गत एकात्मिक पाणलोट क्षेत्राच्या कामांची संकल्पना समजावून घेऊन नियोजनात्मक कृती आराखडा तयार करावा. संबंधित गावातील गावकऱ्यांच्या एकत्रित सहकार्यातून जलयुक्त शिवार अभियानाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणेला दिले.

सर्कीट हाऊस, तुळजापूर येथे महसूल कामकाज, टंचाई परिस्थिती आणि जलयुक्त शिवार अभियानाच्या आढावा बैठकीत श्री.दांगट बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, अतिरिक्त जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एन. उबाळे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. भांगे आदी उपस्थित होते.

श्री.दांगट म्हणाले, रोहयोमार्फत विधंन विहिरीची कामे तत्काळ पूर्ण करावीत आणि जिल्ह्यातील जलसंधारणातील कामे दर्जेदार व्हावीत याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मनोधर्य उंचावण्यासाठी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना सर्व शासकीय विभागाच्या योजनांचा लाभ द्यावा. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी समुपदेशक केंद्र कार्यान्वित करावीत. शेतकरी आत्महत्या होऊच नये, यासाठी सर्व विभागांनी जनजागृती करावी.

या बैठकीत जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पातून सिंचनासाठी उपलब्ध पाणी आणि वापर याचा ताळेबंद तयार करावा. प्रत्येक गावात पाणलोट समितीची स्थापना करणे, सहभागी गावात लोकसहभागाबरोबरच शासकीय निधी उपलब्धता यांचे नियोजन करणे, सर्व तलाव, नदीतील गाळ काढणे, विकेंद्रीत साठे तयार करणे, पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, प्रत्येक हंगामात पेरणी करतांना कृषि विभागाचे सहकार्य करणे, नागरिकांबरोबरच महिला बचतगट, शेतकरी गट, प्रोडयूसर कंपनी , अशासकीय संस्था यांचे मार्फत लोकांना संघटीत करणे, शेतकरी व ग्राहक यांच्यामध्ये साखळी निर्माण करणे आदी विषयांवर श्री.दांगट यांनी सविस्तर चर्चा करुन संबंधित विभागाला अंमलबजावणी करुण्याचे निर्देश दिले.

डॉ.नारनवरे यांनी जलयुक्त शिवार अभियान, जुनोनी येथील ग्रामसभा, महसूल विभागाचे बळकटीकरण, शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपनी, ई-मोजणी, तलाठी दप्तर अद्यावतीकरण मोहीम, महसूल विभागाचा टंचाई आराखडा, चारा टंचाईची स्थिती व नियोजन, रोजगार हमी योजनेतील चालू असलेल्या कामांची आकडेवारीनुसार माहिती, जनजागृतीसाठी आयोजित कार्यशाळा आणि तुळजापूर विकास प्राधिकरणामार्फत करत असलेल्या कामांची सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली.