आता वारकरीही करणार जलयुक्त शिवार अभियानाची जनजागृत


उस्मानाबाद : राज्यात जलयुक्त शिवार अभियानात उस्मानाबाद जिल्ह्याने आघाडी घेतली असून हा वेग अधिक वाढविण्यासाठी आता प्रशासन सरसावले आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन लोकसहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी देहू (जि. पुणे) येथे जाऊन वारकरी बांधवांना जलयुक्त शिवार अभियानात पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

राज्यातील वारकरी बांधवांचा मेळावा देहू येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास जिल्ह्यातील वारकरी बांधवही मोठ्या प्रमाणात गेले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्यासह अपर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी तेथे जाऊन वारकरी बांधवांना जलयुक्त शिवार अभियानाची माहिती दिली.

यावेळी जलयुक्त शिवार अभियान काय आहे? त्यामुळे जिल्हा व राज्य टंचाईमुक्त होण्यास कशी मदत होणार आहे? जलसंधारण क्षेत्र वाढणार आहे? हे सारे डॉ. नारनवरे यांनी वारकरी बांधवांना समजावून सांगितले. डॉ. नारनवरे यांच्या आवाहनास वारकरी बांधवांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आता ही चळवळ जिल्ह्यात अधिक गतीमान होण्यास मदत होणार आहे.