दानवेंचा टोला : युतीत मतभेदाची दरी रुंदावली


 • मुंबई : सत्तेत सहभागी होऊन सतत टीका करीत राहायचे, हे शिवसेनेने टाळले पाहिजे; जनतेलाही ते आवडत नाही, असा सल्ला देतानाच महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री झाला हेच शिवसेनेचे मूळ दुखणे आहे, असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
  काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे २१ विद्यमान आमदार आणि दोन अपक्ष आमदार भाजपात प्रवेश करण्यास उत्सुक असल्याचे सांगत दानवे यांनी सतत सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेला सूचक इशारा दिला. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे खा. दानवे गुरुवारी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. अन्न व सार्वजनिक वितरण आणि ग्राहक व्यवहार या खात्याचे ते सध्या राज्यमंत्री आहेत. बुधवारी त्यांनी
  ‘लोकमत’ कार्यालयास भेट दिली. शिवसेना सातत्याने सरकारविरोधी भूमिका घेत आहे, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता खा. दानवे म्हणाले, की आमच्याजवळ पुरेसे संख्याबळ नाही आणि त्यांना सत्तेशिवाय जमत नाही; त्यामुळे आम्ही एकत्र आलो. खरेतर हा संसार सुखाने चालला पाहिजे. त्यामुळे सेनेने सत्तेत राहून विरोधात बोलणे टाळले पाहिजे. सेनेशी सूर जुळत नसतील तर राष्ट्रवादीने देऊ केलेला बिनशर्त पाठिंबा का घेतला नाही, असे विचारले असता भाजपा व सेनेचा मतदार एकच आहे. सत्तेकरिता कुणाशीही संगत केलेली मतदारांना पसंत पडत नाही, असे मार्मिक उत्तर त्यांनी दिले. (विशेष प्रतिनिधी)
  आंधळा पाठिंबा नाही
  भूसंपादन विधेयक असो की सरकारच्या अन्य कुठल्याही निर्णयाला आंधळा पाठिंबा देणार नाही, असा स्पष्ट इशारा सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. येत्या महापालिका निवडणुकांत एकहाती सत्ता मिळवण्याकरिता कामाला लागण्याचे आदेशही ठाकरे यांनी गुरुवारी कार्यकर्त्यांना दिले.
  शिवसेनेमुळे बैठक रद्द
  भाजपा व सेनेच्या नेत्यांमधील समन्वय समितीची बैठक गुरुवारी होणार होती. मात्र भूसंपादन विधेयक असो की मुंबईचा विकास आराखडा उद्धव ठाकरे यांनी सातत्याने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे भाजपाने ही बैठक टाळल्याची चर्चा आहे. भाजपाचे नेते दिल्लीत असल्याने बैठक पुढे गेल्याचे दानवे यांनी सांगितले.
  शिवसेनेचं वागणं
  कोणालाच पसंत नाही
  पक्ष फुटण्याच्या भीतीने शिवसेना सत्तेत आली की सत्तेत सहभागी होण्याची त्यांची काही अन्य गणिते आहेत, या प्रश्नाचे उत्तर शिवसेनाच देऊ शकेल. आता सतत टीका करीत राहण्याचं सेनेचं वागणं जनतेलाही पसंत नाही, हे त्यांनी ध्यानात घ्यावे, असा सूचक इशारा दानवे यांनी दिला.
  सुखी ‘संसारा’साठी सेनेने विरोध टाळावा
  आमच्याजवळ पुरेसे संख्याबळ नाही आणि त्यांना सत्तेशिवाय जमत नाही; त्यामुळे आम्ही एकत्र आलो. खरेतर आता हा संसार सुखाने चालला पाहिजे.