जिल्ह्यातील सारस्वतांना ग्रंथोत्सवात मानाचा मुजरा

उस्मानाबाद : आपल्या साहित्यसेवेद्वारे जिल्ह्यासह राज्यभरात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिकांना मंगळवारी ग्रंथोत्सव उपक्रमात जिल्ह्यातील साहित्य रसिकांनी मानाचा मुजरा केला.

ज्येष्ठ साहित्यिकांच्या साहित्याची दखल घेत त्यांना उस्मानाबाद जिल्हा माहिती कार्यालयाने आयोजित केलेल्या ग्रंथोत्सव उपक्रमात गौरविण्यात आले. प्रख्यात लेखक प्रा. मिलींद जोशी यांच्यासह जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ॲड. कुलदीप (धीरज) पाटील, जिल्हा कोषागार अधिकारी राहुल कदम यांनी या सारस्वतांचा सन्मान केला.

दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात प्रा. जोशी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

यावेळी योगीराज वाघमारे, ॲड. वा. मा. वाघमारे, श.मा. पाटील, भारत गजेंद्रगडकर, तु.दा. गंगावणे, बाबुराव कांबळे, के. व्ही. सरवदे, शिवमूर्ती भांडेकर, भाऊराव सोमवंशी, जयराज खुने, माधव गरड, राजेंद्र अत्रे, के.बी. सूर्यवंशी, सुभाष चव्हाण, शहाजी कांबळे, ज्ञानेश्वर ढावरे यांचा गौरव करण्यात आला.

प्रजासत्ताकदिनी राजपथावर झालेल्या संचलनात महाराष्ट्राच्या पंढरीची वारी या चित्ररथास प्रथम क्रमांक मिळाला होता. हा चित्ररथ निर्मितीत साहाय्य करणारे जळकोट (तुळजापूर) येथील कलाकार जीवन गुळे यांचाही सपत्निक सत्कार करण्यात आला.

प्रा. जोशी म्हणाले, ज्येष्ठांचे साहित्य हे पुढील पिढीला मार्गदर्शक असते. त्यांच्या साहित्याने दिलेली दिशा ही पुढील पिढीसाठी मार्गदर्शक असते. दोन पिढ्यांमध्ये संवाद साधण्याचे काम साहित्य करत असते. उस्मानाबाद जिल्ह्याला साहित्याची मोठी परंपरा असल्याचेही त्यांनी सांगितले.

ॲड. पाटील म्हणाले, अशा प्रकारे ज्येष्ठ साहित्यिकांचा गौरव ही चांगली परंपरा आहे. साहित्यिकांचा सन्मान करणे ही आपली जबाबदारी आहे. साहित्यिक उपक्रमांना पाठबळ देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

श्री. कदम म्हणाले, ज्येष्ठ साहित्यिक ही जिल्ह्याच्या सांस्कृतिक वैभवाची खूण आहेत.

प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांनी केले तर आभार मराठवाडा साहित्य परिषदेचे उस्मानाबाद शाखेचे सचिव बालाजी तांबे यांनी मानले. सूत्रसंचालन संजय मैंदर्गी यांनी केले.