अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत - मुख्यमंत्री
सोमवार, ०२ मार्च, २०१५
बातमी
मुंबई : राज्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान व स्वाईन फ्लूबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे आढावा घेतला.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे वैयक्तिक पंचनामे तातडीने करावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी दिले. मंत्रालयात सोमवारी सकाळी झालेल्या या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगला मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय, राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ उपस्थित होते.

पंचनामे करताना गाव हा घटक न धरता वैयक्तिक पंचनामे करावेत, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. गेल्या दोन दिवसामध्ये राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारी, हरभरा, गहू, आंबा, द्राक्ष यांचे नुकसान झाले आहे. राज्यात सर्वाधिक पाऊस यवतमाळ जिल्ह्यात झाला असून 17 हजार हेक्टर जमिनीवरील शेतपिकाचे नुकसान या जिल्ह्यात झाले आहे. काही ठिकाणी कापणी करुन ठेवलेल्या पिकांचे, बेदाण्यांचे या अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोकण, पुणे, नागपूर, अमरावती आदी विभागांचा सविस्तर आढावा घेतला.

राज्यातील स्वाईन फ्लूबाबत निर्माण झालेल्या परिस्थितीत अवकाळी पावसाने भर घातली आहे. तापमान कमी झाल्यामुळे स्वाईन फ्लूचा धोका वाढण्याची शक्यता असून पुढील 15 दिवस अतिदक्षतेचे असल्याने मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले. स्वाईन फ्लूवर खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांवर मोफत औषधोपचार करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर आणि लातूर या पाच जिल्ह्यांमध्ये 90 टक्के स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळे या शहरांवर विशेष लक्ष देण्यात यावे. राज्यामध्ये टॅमीफ्लू गोळ्यांचा पुरेसा साठा असून मागणीनुसार या गोळ्यांचा पुरवठा केला जाईल. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यात पुरेसे मास्क तसेच टॅमीफ्लू गोळ्यांचा आढावा घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

उपचाराबरोबरच ठिकठिकाणी स्वाईन फ्लू विषयी जनजागृती मोहीम हाती घेण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. खाजगी रुग्णालयांनी स्वाईन फ्लूवरील उपचार पैशाअभावी रोखता कामा नयेत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.