मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात येत्या दोन दिवसात गारपिटीसह तुरळक पावसाची शक्यता


मुंबई : हवामान खात्याने 14 व 15 मार्च या कालावधीत मध्य महाराष्ट्रात गारपिटीसह तुरळक पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, परभणी आणि हिंगोली, विदर्भातील नागपूर, गोंदिया, वर्धा, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, अकोला या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरिकांनी पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी :

•  गारपीट सुरु असताना बाहेर जाणे टाळावे.
•  दुभती तसेच इतर जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत.
•  ज्या धान्याची कापणी झाली आहे ते धान्य सुरक्षित ठिकाणी ठेवावे.
•  गारपिटीनंतर तापमानात घट होण्याची शक्यता असल्याने थंडीपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
•  गारपीट सुरु असताना विजेच्या तारा कोसळण्याची शक्यता असते तरी त्यापासून दूर होण्याची खबरदारी घ्यावी.