ग्रंथोत्सव उपक्रमास साह‍ित्य रस‍िकांचा उत्स्फूर्त प्रत‍िसाद
उस्मानाबाद : जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने 2 ते 4 मार्च 2015 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथोत्सव उपक्रमास जिल्ह्यातील साहित्य रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तीन दिवसात तब्बल साडे तीन लाखाहून अधिक रुपयांची पुस्तकविक्री या प्रदर्शनातून झाली. साहित्य रसिकांनी दिलेला हा प्रतिसाद पाहता वाचनसंस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उपक्रमाला बळच मिळाले. जिल्ह्यातील ग्रंथोत्सवात सहभागी झालेल्या ग्रंथ विक्रेते आणि पुस्तक प्रकाशक तसेच उपक्रमास सहकार्य करणाऱ्या यंत्रणा आणि व्यक्तींचाही या समारोप प्रसंगी सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातून विविध ग्रंथ व पुस्तक विक्रेते व प्रकाशकांचे 25 स्टॉल्स या ठिकाणी उभारण्यात आले होते. वाचकांसाठी विविध विषयांवरील नामवंत लेखकांची पुस्तके, आत्मचरित्रे, कथा, कादंबरी, कवीता विषयक पुस्तके तसेच पर्यटन, पाककला, सौंदर्य, स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारी पुस्तके अशा विविध विषयांवरील पुस्तकेही या ग्रंथप्रदर्शनात विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आली. ती खरेदी करण्यासाठी वाचकप्रेमीची गर्दी झाल्याचे चित्र या ग्रंथोत्सवात पाहायला मिळाले. यावेळी ग्रंथ विक्रेत्यांनीही पुस्तकांची विक्री झाल्याने समाधान व्यक्त केले.

जिल्ह्यातील साहित्यिक, कवी, ग्रंथालय चालक, प्राध्यापक, डॉक्टर्स, वकील, शिक्षक, स्वयंसेवी संस्था सर्वसामान्य रसिक वाचकांसह शासकीय अधिकारी-कर्मचारी, महिलांच्यासह विद्यार्थ्यांनीही ग्रंथोत्सवाला भेट दिली.

तीन दिवस सुरु असणाऱ्या या उपक्रमास मराठवाडा साहित्य परिषद, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, शाळा/महाविद्यालय, नगरवाचनालय, शासकीय ग्रंथालय, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांनी बहुमोल सहकार्य केले.

समारोप समारंभात मराठवाडा साहित्य परिषद उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष नितीन तावडे, अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष एम.डी. देशमुख, जिल्हा ग्रंथागार अधिकारी गजानन कुरवाडे, जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांच्या हस्ते सहकार्य करणाऱ्या यंत्रणांचा गौरव करण्यात आला. यावेळी श्री.तावडे, एम.डी.देशमुख यांची भाषणे झाली. तर प्रकाशकांच्या वतीने श्री. गोविंदभाई नागर यांनी मनोगत व्यक्त केले.

तीन दिवसांचा हा उपक्रम जिल्हा व जिल्ह्याबाहेर पोहचविण्यात सर्वच प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी मोलाचे सहकार्य केले. यामुळे जिल्हाभरातील साहित्य रसिकांनी या ग्रंथोत्सवाला भेट देऊन पुस्तक खरेदीचा आनंद लुटला.