तुळजापूर बंद दुपारनंतर मागे

तुळजापूर :अभियांत्रिकी महाविद्यालय बचाव कृती समितीच्या वतीने पुकारण्यात आलेला तुळजापूर बेमुदत बंद गुरूवारी दुपारनंतर मागे घेण्यात आला.समितीने केलेली मागणी अध्यक्षांनी मान्य केल्याचे तहसीलदार श्रींगी यांनी समिती सदस्यांना सांगितल्यानंतर बंद मागे घेऊन व्यवहार पूर्ववत सुरूझाले.
गुरूवारी सकाळी महाविद्यालय बचाव कृती समितीने शहरातून फेरी काढून बंद शांततेत पाळण्याचे आवाहन केले होते.त्यानुसार व्यापार्‍यांनी दुकाने बंद ठेवण्याने शहरातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते.सकाळी अकरा वाजता जुन्या बसस्थानक चौकात अचानक रास्ता रोको आंदोलन केले.जवळपास तासभर हे आंदोलन चालल्यानंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक बाळकृष्ण भांगे व तहसीलदार निलेश श्रींगी यांच्या मध्यस्थिनंतर हे आंदोलन मागे घेऊन समिती सदस्यांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.यावेळी दुपारी एकच्या सुमारास महाविद्यालयासंदर्भातील मागणी पूर्णझाल्याची माहिती तहसीलदारांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.या आंदोलनामुळे सोलापूर, नळदुर्ग, लातूर, उस्मानाबाद या रस्त्यावरील वाहतूक बराच काळ खोळंबली होती.आंदोलन मागे घेतल्यानंतरही वाहतूक सुरळीत होण्यास जवळपास अर्धा तास लागला.