शेतकऱ्यांच्या भरपाईसाठी शिवसेना आक्रमक


दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना भरीव नुकसानभरपाई देण्याच्या मागणीसाठी सत्ताधारी शिवसेनेने विधानसभेत आक्रमक होत विरोधी पक्षाची भूमिका बजावली. शेतकऱ्यांना न्याय न दिल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला जनतेने विरोधी पक्षात बसविले. तुम्ही ठोस निर्णय घेतला नाही, तर आपल्यालाही विरोधी पक्षात बसण्याची वेळ येईल, असे परखड बोल शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी सरकारला सुनावले.
दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत भाजपचे डॉ. संजय कुटे यांनी उपस्थित केलेल्या चर्चेवर विरोधी पक्षांपेक्षा शिवसेनाच आक्रमक होती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवालय कार्यालयात सोमवारी शिवसेना आमदारांशी चर्चा केली होती. शेतकऱ्यांना दिल्या जात असलेल्या अपुऱ्या भरपाईबद्दल आणि ती शेतकऱ्यांपर्यंत पोचत नसल्याने शिवसेनेची तीव्र नाराजी असून ती ठाकरे यांच्यासह अन्य नेत्यांनीही उघडपणे व्यक्त केली आहे. विधानसभेतही शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापुढे सरकारच्या तुटपुंज्या मदतीचा आणि ती देण्यातही भेदाभेद केला जात असल्याबद्दल परखड मतप्रदर्शन केले आणि सरकारला अडचणीत आणले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात सहा हजार रुपये भरपाई मिळत होती आणि आता ३९०० रुपये दिले जात आहेत. त्यामुळे मराठवाडय़ात तीव्र नाराजी असून शेतकऱ्यांना काय उत्तर द्यायचे, हे तुम्हीच सांगा, असे खडे बोल थेट मुख्यमंत्र्यांनाच सुनावत अर्जुन खोपकर यांनी सरकारची कोंडी केली. आधीच्या सरकारपेक्षा किमान २०० रुपये अधिक भरपाई द्या, अशी मागणी त्यांनी करताच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी बाके वाजविली आणि सत्ताधारी भाजप सरकारची मात्र पंचाईत झाली. शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्रातील आमदार गुलाबराव पाटील यांचा नूरही आक्रमक होता. महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांच्या मतदारसंघात आणि अन्य लगतच्या भागात अधिक भरपाई व पीकविम्याची मदत मिळत असल्याचा उल्लेख करून हा भेदाभेद का, असा सवाल त्यांनी केला.