उस्मानाबाद जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणांची पाहणी केंद्रीय रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स दाख


उस्मानाबाद जिल्ह्यातील संवेदनशील आणि महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी करून घेणार आढावा

उस्मानाबाद : केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या रॅपीड अ‍ॅक्शन फोर्सच्या ९९ बटालियनने उस्मानाबाद शहरातील संवेदनशिल ठिकाणांची पाहणी करून पथसंचलन केले. सोमवार  सायंकाळी पाचच्या सुमारास ही पाहणी करण्यात आली.
केंद्रीय राखीव पोलिस दलाची हैद्राबाद येथील ९९ बटालियन आज उस्मानाबाद शहरात दाखल झाली. या बटालियनचे प्रमुख डेप्युटी कमांडर एच. पी. सिंग हे आहेत. या बटालियनमध्ये ८५ जवानांचा समावेश आहे. सर्व जवान बंदुकधारी व बुलेटप्रुफ जॅकेट घातलेले आहेत. हैद्राबादपासून ४०० किलोमिटर अंतरापर्यंत या बटालियनचे कार्यक्षेत्र आहे. उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, नांदेड, परभणी, वाशिम हे जिल्हे या बटालियनच्या कार्यक्षेत्रात येतात. या जिल्ह्यातील प्रमुख शहरांचा नकाशा तयार करून संवेदनशिल ठिकाणाची पाहणी केली जाते. भविष्यात जातीय दंगल, नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास या बटालियनला विना अडथळा वेळेत पोहंचता यावे हा उद्देश पाहणी करण्यामागे असल्याचा डेप्युटी कमांडर एस. पी. सिंग यांनी सांगितले.
सोमवारी उस्मानाबाद शहरातील शिवाजी चौक, बसस्थानक, खाजा नगर, शम्स चौक, धारासुर मर्दिनी मंदिर, ईदगाह मैदान, ख्वॉजा शमशोद्दीन गाजी रहे. दर्गा, विजय चौक, नेहरू चौक, भिम नगर, सिव्हील हॉस्पिटल आदि ठिकाणांची पाहणी करून या भागात पथसंचलन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त पोलिस अधिक्षक बाळकृष्ण भांगे, पोलिस उपाधिक्षक मोहन विधाते, शहर पोलिस ठाण्याचे निरिक्षक दगुभाई शेख, विकास नाईक, राजेंद्र बनसोडे यांच्यासह स्थानिक पोलिस सहभागी झाले होते.