उपविभागीय अधिकारी बोधवड यांचा जयलक्ष्मी साखर कारखाण्यास कारवाईचा ईशारा

उस्मानाबाद : नितळी ता. उस्मानाबाद येथील जयलक्ष्मी खाजगी साखर कारखान्याने यंदाच्या गाळप हंगामातील शेतक-यांचे ऊसबिल येत्या दोन दिवसात म्हणजेच पाच मार्चपर्यंत द्यावे अन्यथा जप्तीची कारवाई करण्याचा इशारा उस्मानाबादचे उपविभागीय अधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी कारखाना प्रशासनास दिला आहे.
जयलक्ष्मी साखर कारखाना विजय दंडनाईक यांच्या मालकीचा आहे. यंदाच्या २०१४-१५ या गाळप हंगामात जयलक्ष्मी कारखान्याने औसा तालुक्यातील वांगजी, हिप्परगा, आंबेगाव, दाऊदपूर, तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा, अणदूर, मानेवाडी, वागदरी, हगलूर, गंधोरा, सलगरा दिवटी आदि गावच्या शिवारातील ऊस आणून गाळप केले. कारखान्याने यंदाच्या हंगामात ५२ हजार टनाचे गाळप केले व कारखाना बंद झाला. जवळपास तिन महिने कारखान्याला ऊस जाऊन झाले तरी ऊसाचे बिल मिळेना, चेअरमच विजय दंडनाईक गायब झाले. त्यांचा मोबाईल फोनही लागत नाही. कारखाना ऑफिस त्यांच्या, वसंतदादा, अरविंद बँकेत चकरा मारूनही कांही उपयोग होईना. म्हणून ऊस उत्पादक शेतक-यांनी २ मार्च रोजी उस्मानाबादेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे सोमवारी शेकडो ऊस उत्पादक शेतकरी उपोषणासाठी उस्मानाबादेत दाखल झाले होते. उपविभागीय अधिका-यांनी शेतक-यांनी उपोषण करू नये म्हणून मध्यस्थी केली. त्यांनी महसुल भवनमध्ये ऊस उत्पादक शेतकरी व कारखाना प्रशासनाची तातडीची सुनावणी ठेवली. सुनावणीला कारखान्याचा एकच कर्मचारी उपस्थित होता. येत्या पाच मार्चपर्यंत ऊस उत्पादक शेतक-यांचे बील द्या, अन्यथा कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्याचा इशारा उपविभागीय अधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी दिला.
जयलक्ष्मी कारखान्याची उभारणीपासूनच वाताहत सुरू आहे. भंगारातील मशिनरी आणून कारखाना उभारला पण चालला नाही. दरम्यानच्या काळात तेरणा कारखान्याचे कर्मचारी संपावर होते. त्या कर्मचा-यांनी जयलक्ष्मी कारखान्यावर मेहनत घेऊन कारखाना सुरू केला. पण तेरणाच्या कर्मचा-यांच्या सुद्धा पगारी केल्या नव्हत्या. यंदाच्या हंगामात थोडीशी डागडूजी करून कारखाना सुरू केला.
शेतक-यांचा विश्वास उडाल्याने कुणीच ऊस दिला नाही. त्यामुळे औसा, तुळजापूर, बार्शी तालुक्यातुन ऊस आणावा लागला. रखडत कसे तरी ५२ हजार टनाचे गाळप केले. परंतू शेतक-यांना तिन महिने झाले तरी ऊसाचे बिल मिळाले नाही. कारखाना साईट व उस्मानाबादच्या कार्यालयात आजही शेतकरी चकरा मारत आहेत. कारखान्यावर फक्त वॉचमन शिवाय कोणीही नाही असे शेतक-यांनी सांगितले.