स्वच्छ भारत अभियानाची पंतप्रधानाच्या हास्ते सुरूवात

:रिपोर्टर...  महात्मा गांधी जयंतीनिमीत्त केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ‘स्वच्छ भारत अभियानाची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरूवात केली आहे. मोदींनी थोड्याच वेळापूर्वी दिल्लीतल्या वाल्मिकी वस्तीत जाऊन स्वतः झाडू हातात घेऊन सफाई केली. त्याआधी पंतप्रधानांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली अर्पण केली. तिथून विजयघाट इथे लालबहादूर शास्त्रींनाही त्यांना श्रद्धांजली वाहिली.
पंतप्रधानांसह अनेक केंद्रीय मंत्री आज देशातील विविध शहरांमध्ये हातात झाडू घेऊन स्वच्छतेचा संदेश देतील. शासकीय कर्मचारी देखील या अभियानात सहभागी होणार आहेत. जवळपास 30 लाख कर्मचारी स्वच्छतेची शपथ घेतील. या योजनेनुसार देशातल्या 500 शहरांमध्ये कचरा व्यवस्थानासाठी विशेष उपाय योजना करण्यात येणार आहेत.
महात्मा गांधी यांना 150व्या जयंतीनिमित्त अनोख्या पद्धतीने आदरांजली अर्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘स्वच्छ भारत’ अभियानाची संकल्पना मांडली होती. यासाठी त्यांनी आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळाला कामाला जुंपले आहे. ही योजना लोकचळवळ बनावी असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं असून त्यांनी देश परदेशातल्या अनेक कार्यक्रमांमध्ये या योजनेबाबत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. प्रत्येक व्यक्तीने वर्षातील शंभर तास स्वच्छतेला द्यावेत, असं आवाहनही मोदी यांनी केले आहे.