५६ उमेदवार निवडणूक रिंगणात

उस्मानाबाद रिपोर्टर.. : उस्मानाबाद जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघातुन आज उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी ५२ उमेदवारांनी माघार घेतल्याने ५६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. अर्ज परत घेणा-यामध्ये प्रामुख्याने उस्मानाबादमधुन शिवाजी कापसे, धनंजय पाटील, तुळजापूरमधुन महेंद्र धुरगुडे, गणेश सोनटक्के, अशोक जगदाळे, सत्यवान सुरवसे, उमरगामधुन हरीष डावरे, सुनिल सुर्यवंशी, विलास व्हटकर, तर परंड्यातुन गोरख खैरे, सुरेश कांबळे या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे.
आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. उस्मानाबादमधुन १५ जणांनी माघार घेतल्याने २० उमेदवार रिंगणात राहिले आहेत. उमरगामधुन ११ जणांनी माघार घेतली असुन १३ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तुळजापूरमधुन १८ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज परत घेतले. त्यामुळे १३ उमेदवार निवडणूक आखाड्यात राहिले आहेत. तर परंडा विधानसभा मतदार संघातुन ८ जणांनी माघार घेतल्यामुळे १० उमेदवारांमध्ये लढत होत आहे. जिल्ह्यात तसं पाहता परंडा, उस्मानाबाद व उमरगा या तीन विधानसभा मतदार संघात काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना, भाजपा अशी चौरंगी लढत होत आहे. तर तुळजापूर विधानसभा मतदार संघात काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना, भाजपा व मनसे अशी पंचरंगी लढत होणार आहे. आज उमेदवारी अर्ज परत घेण्याची मुदत संपल्यानंतर चारही विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले.
आता उद्यापासून ख-या अर्थाने प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. कोण किती जोर लावतो? याकडेच मतदारांचे लक्ष लागले आहे.