..21 टीएमसी पाण्याचा प्रश्न सोडवणार — विनोद तावडे


उस्मानाबाद रिपोर्टर : भाजपाचे उमेदवार निवडून देऊन राज्यात सत्ता द्या, आम्ही मराठवाड्याला हक्काचे २१ टिएमसी पाणी मिळवून देऊच असे आश्वासन भाजपा नेते तथा विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केले.
उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार संजय पाटील दुधगावकर यांच्या प्रचारार्थ उस्मानाबाद येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी दुधगावकर, तुळजापूर विधानसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार संजय निंबाळकर, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. मिलींद पाटील, युवा मोर्चाचे दत्ता कुलकर्णी, धनंजय शिंगाडे, खंडेराव चौरे आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना विनोद तावडे म्हणाले, राज्यात भाजपाचे सरकार आणण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी प्रत्येक उमेदवार निवडून आणणे गरजेचे आहे. यापूर्वी २००९ च्या निवडणूकीचा अपवाद वगळता जिल्ह्यात भाजपाचा उमेदवार नव्हता. तशीच अवस्था
सिंधुदूर्गमध्ये होती.
आता भाजपा सर्व जागा लढवत आहे. कांही ठिकाणी इतर पक्षातील व्यक्तींना भाजपात घेऊन उमेदवा-या दिल्या आहेत. पण ज्यांनी सामान्य माणसात वाहून काम केले अशा सच्चा कार्यकत्र्यालाच भाजपाने पक्षात घेतले आहे. दुधगावकर हे असेच सच्चे कार्यकर्ते असल्याने त्यांना साथ द्या. आज राज्यातील ११ कोटी जनता भाजपाला साथ देणार आहे. तुम्हीही मागे राहू नका. मराठवाडा व उस्मानाबाद जिल्ह्यातुन सर्वाधिक आमदार निवडून द्या. मराठवाड्याला आम्ही त्यांच्या हक्काचे पाणी मिळवून देऊ. ही उपसा सिंचन योजना आहे त्यासाठी मोठा खर्च असला तरी तो निश्चित करू असे आश्वासनही तावडे यांनी दिले.
अनेकांचा भाजपत प्रवेश
यावेळी दुधगावकर समर्थक विविध पक्षातील असंख्य कार्यकत्र्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यात प्रामुख्याने त्रिंबक शेळके, शहाजी पाटील, प्रभाकर जाधव, विलास गाडे, आबासाहेब आडसुळ, दिलीप पाटील यांच्यासह विविध गावातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकत्र्यांचा समावेश होता. तसेच पेशवा युवा संघटनेचे उमेदवार धनंजय पाटील यांनी आपली उमेदवारी मागे घेऊन दुधगावकर यांना पाठिंबा दिला. त्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
पोलिसांवर कारवाई करू
या बैठकीपूर्वी विनोद तावडे यांची संजय निंबाळकर यांच्या प्रचारार्थ कनगरा येथे जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी कनगरा ग्रामस्थांवर अन्याय व अत्याचार करणा-या पोलिसांवर राज्य शासनाने कुठलीच कारवाई केली नसल्याबद्दल टिका केली व ते अधिकारी माझ्या लक्षात आहेत. आमचे सरकार येऊ द्या त्यांच्यावर कठोर कारवाई करतो असे म्हटले.या बैठकीस उस्मानाबाद, कळंब व तुळजापूर तालुक्यातील भाजपाचे कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.