विधानसभेच्या तिकीटासाठी दुधगावकरांची भाजपाकडे धाव

उस्मानाबाद  रिपोर्टर : जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा काँग्रेसचे नेते संजय पाटील दुधगावकर यांनी काल रात्री उशिरा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. ते उस्मानाबाद मतदारसंघातून भाजपतर्फे निवडणुक लढविणार हे खरे आहे . परंतु फक्त तिकीटासाठीच भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या चर्चा सगळीकडे होत आहेत.
जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी काल काँग्रेस नेत्यांवर नाराज होवून भाजपामध्ये प्रवेश केला. संजय पाटील दुधगावकर हे नारायण राणे यांचे कट्टर समर्थक म्हणुन जिल्हाभर परिचित आहेत. पुर्वी ते शिवसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते होते. मात्र नारायण राणे यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर ते काँग्रेस पक्षामध्ये आले. काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणुक लढविली. या निवडणुकीत त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मेव्हुण्याला चारीमुंड्या चित करत विजय मिळवला. त्यानंतर माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्याशी असलेल्या त्यांच्या संबंधामुळे ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपदी विराजमान झाले. उपाध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी अनेक विकासकामाच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवला होता. काँग्रेस पक्षाची ताकद वाढविण्यासाठी त्यांचा मोठा हातभार होता. ही विधानसभा लढविण्याची त्यांची इच्छा होती. काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी म्हणुन त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. मात्र जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी न ऐकल्याने रात्री उशिरा त्यांनी भाजपाकडून आपली उमेदवारी निश्चित करुन घेतली. व नंतर भाजपामध्ये जाहिर प्रवेश केला. रात्री १२ वा. भाजपाचा अधिकृत ए.बी. फार्म मिळविला. त्यानंतर दुधगावकरांच्या अनेक समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला.
दुधगावकर यांना भाजपाकडून उमेदवारी मिळाल्याने भाजपाला तगडा उमेदवार मिळाला असुन येत्या काळात अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते दुधगावकर सोबत भाजपामध्ये येण्याची शक्यता आहे.