मोटेंचा मतदार संघामध्ये गाठी-भेटीवर भर



भूम रिपोर्टर..: परंडा विधानसभा मतदार संघात प्रचाराचा धुराळा मोठ्या प्रमाणात उडू लागला आहे. यामध्ये प्रामुख्याने राजकीय नेते मंडळींमध्ये युद्धपातळीवर हालचालींना वेग आला आहे. यामध्येही राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार आ. राहुल मोटे यांच्या प्रचारार्थ त्यांच्या सौभाग्यवती वैशालीताई मोटे यांनी वैयक्तीक गाव पातळीवर जाऊन गाठी-भेटीवर भर देत मतदार संघ पिंजून काढला आहे.
विधानसभा समोर ठेऊन सर्वच राजकीय पक्षाचे नेते मंडळी कामाला लागले आहेत. यामध्ये सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार आ. राहुल मोटे यांच्यासाठी बचत गटाच्या माध्यमातुन भूम-परंडा-वाशी तालुक्यात यशस्विनी अभियानच्या माध्यमातुन महिला चळवळ सक्षम करणा-या वैशालीताई मोटे परिश्रम घेत आहेत. गावोगावी जाऊन बचत गटाशिवाय इतरही महिलांच्या गाठी-भेटीवर भर देत आहेत. त्यांचे जवळपास मतदार संघात शेकडो बचत गट स्थापन केलेले आहेत. त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून अधिकाधिक महिला स्वावलंबी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बँकेकडून अर्थसहाय्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. आजपर्यंत केलेल्या चळवळीचा फायदा ते आमदार मोटे यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत.
या उलट मतदार संघातील मात्तब्बर उमेदवार शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांची गाव, वाडी, वस्तीवर शिवसेनेची फळी तयार आहे. त्यांच्या गाठी-भेटी घेऊन केलेल्या कामाची आठवण करून देत भविष्यातील कामाची ध्येय धोरणे समजावून सांगण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. यातुन ते पुन्हा एकदा नेतृत्वाची संधीची अपेक्षा करत आहेत. त्यांना इतरही पक्षातील नाराज गटाचा आधार मिळत असल्याने त्यांचेही पारडे सध्या तरी कांही प्रमाणात जड असल्याचे दिसते. आगामी काळात कितपत गती घेतात यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. याशिवाय भूम-परंडा-वाशी तालुक्यात गेल्या दोन वर्षात दुष्काळाने ग्रासले होते. दरम्यानच्या काळात राज्यात आदर्श जनावरांची छावणी चालवून स्वत:चे अस्तित्व निर्माण करणारे आणि जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा अनुभव असलेले माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांचा दैनंदिन जवळपास ५० हजार लिटर दुध संकलनाच्या माध्यमातुन गाव पातळीवर दैनंदिन वैयक्तीक संपर्क आहे. शिवाय त्यांना यावेळेस महायुतीमधील भाजप, रासप, आरपीआय आणि स्वा. शे. संघटनेचा आधार आहे. यातुन ते कितपत आघाडी घेतात आगामी काळात दिसणार आहे.
मतदार संघात उमेदवारांची संख्या अनिश्चित आहे. तरी देखील मनसेचे नगरसेवक गणेश शेंडगे रेल्वे इंजिन तर काँग्रेसचे अ‍ॅड. नुरोद्दीन चौधरी हाताचा पंजा या चिन्हावर मात्तब्बरांनी निवडणूक आखाड्यात नशिब आजमावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनाही त्यांच्या पक्षातील नेते त्यांना कितपत योगदान देतात यावर त्यांचे मताधिक्य अवलंबून राहणार आहे. निवडणूकीच्या दरम्यान कट्ट्यावर आणि ओट्यावर बसून चवीने चर्चा करणारा चाणाक्ष मतदार कोणाच्या पारड्यात विजयाचा कौल देतो याकडे उमेदवारांसह सर्वांचेच लक्ष लागले आहे.