नवनीत राणा यांच्या कारवर हल्ला

रिपोर्टर लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या कारवर मंगळवारी रात्री काही अज्ञात इसमांनी हल्ला केला. नवनीत राणा यांच्या इनोव्हा कारवर अज्ञात हल्लाखोरांनी हल्ला करून गाडीची तोडफोड केली आणि काचा फोडल्या.
हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झाला असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
राष्ट्रवादीच्या 18 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली यात अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा-कौर यांना उमेदवारी देण्यात आलीय. नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. परिणामी अमरावतीत राणा यांच्या उमेदवारीमुळे नाराजांनी गळा काढलाय.
निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून बाहेरच्या उमेदवाराला तिकीट दिल्याबद्दल राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उघड उघड नाराजी व्यक्त केलीय. यामुळे अमरावतीत राष्ट्रवादीत नाराजी पसरलीय याच नाराजीतून हा प्रकार घडला असावा असा संशय व्यक्त होत आहे.