.मनसे लोकसभा लढवणार

मुंबई.लोकसभा निवडणूक लढवू नका असं साकडं नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांना घातलं होतं पण राज यांनी गडकरींची मागणी फेटाळली असून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचं ठरवलंय. मनसे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकार्‍यांना लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचा आदेश दिला आहे. उमेदवारांची यादी 9 मार्चला पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जाहीर करण्यात येणार असल्याचं कळतंय. या कार्यक्रमात शिवसेनेच्या ठाण्यातील युवा नेत्यांचा मनसेत प्रवेश होण्याची शक्यता आहे.
मुंबईतून 5 जागा जाहीर होणार आहे, तर नाशिक, पुणे, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, यवतमाळ-वाशिम या ठिकाणी लोकसभेसाठी उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
अलीकडेच नितीन गडकरी यांनी राज यांची भेट घेतली यावेळी मतांचे विभाजन होऊ नये यासाठी गडकरींनी मनसेनं लोकसभा लढू नये असं आवाहन केलं होतं. पण या भेटीमुळे शिवसेनेच्या गोटात एकच खळबळ उडाली होती. सेनेनं अपेक्षेप्रमाणे कडाडून टीका केली. पण देशभरात मोदींची लाट आणि निवडणूक पूर्व सर्व्हेमधून एनडीएची आगेकूच दाखवण्यात आलीय. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी कोणतीही रिस्क न घेता राज्यात मताची विभाजन होऊ नये यासाठी मनसेला साकडं घातलं पण राज यांनी तिसर्‍या आघाडीची मोट बांधत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचं निश्चित केलंय.