अपघात विमा योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे अपूर्ण प्रस्तावांच्या पूर्ततेसाठी कॅम्प घ्या - डॉ. नारनवर

उस्मानाबाद, रिपोर्टर.  शेतकरी जनता अपघात विमा योजनेत विमा कंपनीने ज्या शेतकऱ्यांचे विमा दावे फेटाळले असतील त्यांना ग्राहक संरक्षण मंचामार्फत न्याय मिळण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी कृषी विभागाला दिल्या.
     येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी जनता विमा अपघात योजनेचा आढावा डॉ. नारनवरे यांनी घेतला. जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांच्यासह संबंधित विमा कंपनीचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
     जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे म्हणाले की, ज्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव नाकारल्याने त्यांनी ग्राहक मंचाकडे दाद मागितली आहे. त्या प्रस्तावासंदर्भात कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बाजूने पाठपुरावा करावा.  प्रलंबित प्रकरणांच्या बाबत विमा कंपनीने एका महिन्याच्या आत कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
विमा कंपनीने ज्या शेतकऱ्यांच्या प्रस्तावासंदर्भात त्रुटी काढल्या आहेत, त्या त्रुटींची पूर्तता करुन घेण्यासाठी कृषी विभागाने मेळावे घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. शेतकऱ्यांच्या वतीने राज्य शासन ही विमा हप्ता रक्कम संबंधित विमा कंपनीकडे जमा करीत असते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव नाकारले गेले आहेत, त्यांची बाजू कृषी विभागाने मांडलीच पाहिजे, असे डॉ. नारनवरे यांनी यावेळी सुनावले.  श्री. तोटावार यांनी यावेळी  योजनेबाबतचा मासिक अहवाल सादर केला