गडकरी राज यांच्या भेटीमुळे शिवसेनेत खळबळ..

.रिपोर्टर 
लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागलेत. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रचार केल्यास जनता माफ करणार नाही. भाजपमधून कोणी सत्ताधारी नेत्यांवर स्तुतिसुमने उधळत असेल तर त्याला भाजपमधील कम्युनिकेशन गॅप कारणीभूत असल्याचे परखड व सडेतोड मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरींचे नाव न घेता व्यक्त केले.
भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी काल दुपारी राज ठाकरे यांची मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट घेतल्यानंतर अपेक्षेप्रमाणे त्याचे पडसाद उमटायला लागलेत. या भेटीमुळे नाराज झालेल्या उद्धव यांनी भाजपकडे या भेटीचा खुलासा मागितला. हा खुलासा देण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री मातोश्रीवर धाव घेतली.
काही दिवसांपूर्वी गडकरी यांनी राज, पवारांची स्तुती केली होती, मात्र हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे, असं उद्धव यांनी म्हटलंय. भाजपमधून कोणी सत्ताधारी पक्षावर स्तुतीसुमने उधळत असतील तर त्याला भाजपमधला संवादाचा अभाव कारणीभूत असल्याची टीकाही त्यांनी केली.
एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीला टक्कर देण्यासाठी महायुती जोरदार प्रयत्न करतेय. तर दुसरीकडे राज ठाकरेंवरून पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपदरम्यान तणाव निर्माण झालाय.